नाशिक : ‘आय फ्लू’ झालेल्या विद्यार्थ्यांना चार दिवसांची सुटी

file photo
file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या शहरात 'आय फ्लू' (डोळे येण्याचा प्रकार) ची साथ झपाट्याने पसरत असून, शाळकरी मुलांना त्याची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने, एका विद्यार्थ्यापासून इतर विद्यार्थ्यांना त्याची लगेचच लागण होते. अशात खबरदारी म्हणून ज्या विद्यार्थ्याला 'आय फ्लू' त्यास किमान चार दिवसांची सुटी मंजूर केली जावी. तसेच त्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, अशा सूचनांचे पत्रच मनपा शिक्षणाधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविणार आहे.

मुंबई, नागपूरनंतर नाशिकमध्ये 'आय फ्लू'ची साथ झपाट्याने पसरत आहे. हा आजार सामान्य असला तरी, संसर्गजन्य असल्याने इतरांना त्याची लागण लवकर होते. त्यामुळे शाळकरी मुलांमध्ये तो मोठ्या प्रमाणात पसरत असून, गेल्या काही दिवसांपासून पटावरील संख्याही कमी होत आहे. शहरात मनपासह खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांची संख्या ३५५ इतकी आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या २७ हजार ९७ इतकी आहे. बहुतांश शाळांमधील विद्यार्थी या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मनपा आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार मनपा शिक्षणाधिकाऱ्यांकडून हा पत्रप्रपंच केला जाणार आहे. दरम्यान, या आजाराची लागण साधारत: तीन ते चार दिवस असल्याने, या काळात विद्यार्थ्याला अधिकृत सुटी दिली जावी, तसेच या काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची जबाबदारीही संबंधित शिक्षकांवर सोपविण्यात यावी, अशा सूचना या पत्राद्वारे दिल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये 'आय फ्लू' आजार झपाट्याने पसरत असल्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. तसेच चार दिवसांमध्ये होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असणार आहे.

– बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news