नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
देवळाली गावातील गणेश मंदिर सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयोजित शिवजयंतीच्या बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात बाचाबाची होऊन एकाने थेट हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, देवळालीगावात दंगाविरोधी पथक दाखल झाले असून, बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
शिवजयंती उत्सवासाठी बैठक सुरू असताना दोन्ही गट तलवारी, कोयते, लाठ्या-काठ्या काढून एकमेकांवर धावून गेले. उपनगरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांना माहिती मिळताच ते पोलिसांसह दाखल झाले. जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केल्याचे समजते. या घटनेमुळे तणावाची स्थिती असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चौधरी यांनी दोन्ही गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद व तणाव वाढतच गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सचिन चौधरी यांनी वरिष्ठांना कळवले. पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माईनकर, नाशिकरोडचे अनिल शिंदे, देवळाली कॅम्पचे कुंदन जाधव तातडीने दाखल झाले. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या देवळालीगावात काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. काही पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना गटात दाखल झाले. तर काही पदाधिकारी नुकतेच ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यातून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
हेही वाचा :