पुणे : ‘कमला नेहरू’तील आयसीयूचे दर चढेच; गरिबांनी उपचार कुठे घ्यायचे? | पुढारी

पुणे : ‘कमला नेहरू’तील आयसीयूचे दर चढेच; गरिबांनी उपचार कुठे घ्यायचे?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्यात आला. आयसीयूमध्ये एका रुग्णाला एका दिवसाला 8 ते 10 हजार रुपये खर्च येऊ शकतो. महापालिकेच्या रुग्णालयातही खासगी रुग्णालयांइतका खर्च येणार असल्यास गरीब रुग्णांनी कोठे उपचार घ्यायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षांपासून महापालिकेकडून कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

पंधरा दिवसांपूर्वी विभाग सुरू झाला असून, सध्या सात-आठ रुग्ण दाखल आहेत. रुग्णांकडून केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेपेक्षा 1 टक्का कमी दराने शुल्क आकारले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, सध्याचे दरपत्रक पाहता एका रुग्णाला 8 ते 12 हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो. शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्येही चढे दर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी सोनोग्राफी, एक्स रे, डायलिसिसची सुविधा आयसीयूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या अशा रुग्णांना पुन्हा ससून रुग्णालयात पाठवले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सीजीएचएस योजनेतील दरांनुसार आयसीयूमधील उपचारांचे दर आकारण्याच्या द़ृष्टीने महापालिकेने खासगी एजन्सीशी करार केला आहे. आयसीयूमध्ये 15 आयसीयू बेड आणि 10 व्हेंटिलेटर आहेत. सध्या, प्रत्येक शिफ्टमध्ये एक इंटेन्सिव्हिस्ट, दोन नर्स आणि तीन हाउसकीपिंग कर्मचारी रुजू करण्यात आले असून, तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करणार आहेत. डॉ. सॅम्स मेडिकल कन्सल्टन्सी या संस्थेला आयसीयू चालविण्याचे काम देण्यात आले आहे.

आयसीयूसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली असून, डॉक्टर, कर्मचारी आणि व्यवस्था एजन्सीकडून पुरवण्यात आली आहे. साधनसामग्री 50 टक्के एजन्सीतर्फे, तर 50 टक्के महापालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. शहरी-गरीब योजनेतील रुग्णांना बिलाच्या रकमेचा 50 टक्के परतावा महापालिकेकडून दिला जाणार असून, 50 टक्के रक्कम स्वत: भरावी लागणार आहे. अंशदायी वैद्यकीय योजनेतील रुग्णांना 90 टक्के परतावा महापालिकेकडून मिळणार असून, 10 टक्के स्वत:चा भरावा लागेल.

आयसीयूच्या दरपत्रकात बेड चार्ज, कार्डिअ‍ॅक मॉनिटरिंग, ऑक्सिजन, आयव्ही इन्फ्यूजन असे 23 प्रकारचे दर समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णाला सर्वच यंत्रणेची गरज भासणार नसल्याने खासगी रुग्णालयांइतके शुल्क भरावे लागेल, यामध्ये तथ्य नाही. डॉ.संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी

खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये एका दिवसाला 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. महापालिकेच्या रुग्णालयातील आयसीयूमध्येही इतका खर्च येणार असल्यास सामान्य लोकांना शुल्क परवडणार नाही. कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयूचा सेटअप लहान आहे. तो वाढवण्याचीही आवश्यकता आहे.

                              – डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

Back to top button