नाशिक : वैभव कातकाडे
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जलजीवनच्या कामांना जिल्हा परिषदेतर्फे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेला जिल्ह्यासाठी साधारणपणे १५०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्या दृष्टिकोनातून १२९२ कामांना निविदाप्रक्रिया राबवून मान्यता देण्यात आली आहे. १५ महिने म्हणजे साधारणपणे मार्च २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत या कामांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
केंद्रशासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध विकासकामे राबविले जात आहेत. केंद्र सरकारने २०१९ रोजी प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले आहे. हे उद्दिष्ट मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १९१५ गावांपैकी १२९२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनाचे आराखडे तयार केले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत कामांची विभागणी तसेच कामांची वाटपात डिसेंबरअखेर पर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १२९२ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.
अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे
जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी ती कामे संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करायची आहेत. यापूर्वी सरपंच हे प्रमाणपत्र देत होते. आता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे अधिकार दिल्याने सरपंचांचा हस्तक्षेप नाहीसा होणार आहे.
पाण्याच्या टाक्यांना एकसारखाच रंग
जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या जलकुंभांना एक सारखाच रंग देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना नाशिक जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य ठरून वेगळी ओळख निर्माण होईल. यासाठी कार्यकारी अभियंता रंग निश्चित करणार आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत मुदतवाढ
ठेकेदारांनी प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश मिळविण्यात बराच कालावधी गेला असल्याने तसेच अनेक ठिकाणी शासकीय विभागाचा जागांची अडचण येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला, आणि मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. मात्र, जलजीवनची कामे दिलेल्या वेळातच पूर्ण करावी लागणार आहे. काही अपवादात्मक ठिकाणी मोठी अडचण आल्यास त्याचा विचार करून योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा :