नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या घटना प्रामुख्याने समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सि-व्हिजील ॲपवर आजपर्यंत ७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर ११ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये निफाड, येवला व सुरगाण्यातील अवैध दारु जप्तीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार २० मे रोजी पाचव्या टप्यात मतदान पार पडणार आहे. राजकीय स्तरावर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उमेदवारांकडून प्रचाराची राळ ऊडविली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापून निघत आहे. प्रचाराच्या धामधुमीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या घटनादेखील घडत आहेत. प्रशासनाकडून या घटनांची तातडीने दखल घेतली जात आहेत. निवडणूक घोषित झाल्यापासून ते आजतागायत प्रशासनाकडे सि-व्हिजीलवर ७१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात विकासकामांचे फलक ऊघडे पडणे, वाहनां वर ऊमेदवाराचे छायाचित्र व झेंडा लावणे, विनापरवानगी स्टिकर्स चिटकवणे व बॅनर्स लावणे यासह विविध तक्रारींचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने तपासणीअंती ४४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने त्याचा तातडीने निपटारा करण्यात आला. तर २७ तक्रारींमध्ये तथ्य नसल्याने त्या जागेवर बंद करण्यात आल्या. याशिवाय ११ घटनांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक ७ गुन्हे अवैध दारुसाठा जप्तीचे असून गुटखाप्रकरणाचा एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय देवळाली विधानसभा मतदारसंघातंर्गत पळसे येथा आक्षेपार्ह फलकाप्रकरणी तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघात पाथर्डी फाटा व आसरा पाईंट, दामोदर नगर येथे भिंतीवर भाजपाच्या पक्षाच्या बोधवाक्याबाबतचा असे तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
अवैध दारुचा महापूर
लोकसभे निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत अवैध दारुसंदर्भात सात गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक तीन गुन्हे निफाडमध्ये दाखल आहेत. त्या खालोखाल येवल्यात दोन तर मालेगाव बाह्य व सुरगाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तसेच दिंडोरीतून गुटखा जप्त करण्यात आला.
हेही वाचा: