नांदेड : खडकी पाणीदार होण्याच्या दिशेने…(व्हिडिओ)

नांदेड : खडकी पाणीदार होण्याच्या दिशेने…(व्हिडिओ)
Published on
Updated on

नांदेड; (विश्वास गुंडावार) : तेलंगणा सीमेवर डोंगरदऱ्यात वसलेले एकशे चाळीस कुटुंबाचे खडकी गाव तसे नामदेव महाराजांच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. नामदेव महाराजांना नवस बोलला की अपत्यप्राप्ती होते अशी इथली आख्यायिका. याचमुळे इथल्या पन्नास-साठहून अधिकचे 'नामदेव' हेच नाव पाहायला मिळते.

सर्वसामान्य गावाप्रमाणेच असणाऱ्या या गावात बहुतांश सामान्य नागरिक. एकही चारचाकी नसलेल्या या गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोटार सायकली. गावाच्या कोणत्याही कार्यक्रमात एकजुटीने पुढाकार घेण्याच्या गावकऱ्यांच्या परंपरेने त्यांच्या मनाची श्रीमंती दिसून येते. वैशिष्ट म्हणजे या गावाने कोरोनाला वेशीवरही येऊ दिले नाही. आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण न सापडलेल्या या गावात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. अशा खडकी या गावामध्ये भविष्यात पाणीप्रश्न उद्भवू नये म्हणून सेवा समर्पण परिवार आणि प्रशासनाच्या साथीने पाण्यासाठी मोठे काम सुरु आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे आणि सेवा समर्पण परिवाराचे सचिन फुलारी यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी श्रमदानातून गावाच्या पाण्यासाठी काम करण्याचे ठरले. गेली एक्कावन्न दिवस अविरत सुरु असलेल्या या श्रमदानातून अनेक कामे केली जात आहेत. माती नाला बंधामधील गाळ काढणे, सीसीटी खोदकाम आदी कामे पूर्ण करून आतापर्यंत ६० लाख लिटर पाणी जमिनीत मुरवण्याचे काम पूर्ण झाले आहे. वैशिष्ठ्य म्हणजे काही गटांमध्ये विभागलेले हे गाव सध्या या कामामुळे एकजूट झाल्याचेही दिसत आहे.

लोकसह्भातून सुरु असलेल्या या श्रमदान यज्ञात सेवा समर्पण परिवार, ग्रामस्थ व मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी अमित राठोड यासह अनेकांनी योगदान देत आहेत. आज खडकी पाणीदार होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे आणि म्हणूनच भविष्यात हे गाव स्मार्ट व पाणीदार म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसेल एवढे मात्र निश्चित.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news