NAMCO Bank Election : उमेदवारांच्या ‘माघारी’साठी नेते मैदानात, गिरीश महाजनांची शिष्टाई

गिरीश महाजन
गिरीश महाजन
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रासह परराज्यात शाखांचे जाळे विस्तृत करणाऱ्या दि नासिक मर्चन्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे बड्या नेत्यांचे लक्ष असून, माघारीसाठी या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये माजी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आघाडीवर असून, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडूनही फोनाफाेनी केली जात आहे. नेत्यांची ही शिष्टाई फळाला येत असून, दोन दिवसांत ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, माघारीच्या दुसऱ्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने, आता १६१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

दि. १२ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत असली, तरी उमेदवारांची संख्या लक्षात घेता, तिसऱ्या आघाडीचा पर्याय तर समोर येणार नाही ना, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. अशात उमेदवारांच्या मनधरणीसाठी दोन्ही पॅनलच्या बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये माजी पालकमंत्री गिरीश महाजन आघाडीवर असून, उमेदवारांना स्वत: फोन करून अर्ज माघारी घेण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडूनही काही उमेदवारांना फोन गेले आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याची खूणगाठ बांधलेले उमेदवार अर्ज माघारी घेत असून, दि. १२ डिसेंबरच्या आत बड्या नेत्यांना माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी (दि. ६) पाच उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर गुरुवारी (दि. ७) त्यात सहा माघारी अर्जांची भर पडली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या आता १६१ वर आली आहे. २१ जागांसाठी होत असलेल्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला १७८ सभासदांनी २७२ अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर सहा अर्ज बाद झाल्याने, १७२ उमेदवार रिंगणात होते. त्यातील ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

या उमेदवारांनी घेतली माघार

सर्वसाधारण गटातून अशोक जवरीलाल मोदी, जवरीमल छोटूमल भंडारी, गौतम प्रकाशचंद पारख, अनिल मूळचंद बुरड, महिला राखीव गटातून अनिता अमृतलाल पिपाडा, तर अनुसूचित जाती /जमाती गटातून राहुल अशोक दिवे यांनी माघार घेतली आहे.

माझ्याऐवजी भाऊ प्रकाश दिवे यांना पुन्हा संचालक पदाची संधी मिळावी यासाठी माघार घेतली आहे. प्रगती पॅनलकडून त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– राहुल दिवे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news