नागपूर : हिरे पारख नसलेल्‍या चोरट्यांनी ९ लाखांचे हिरे चक्‍क फोडून फेकले

नागपूर : हिरे पारख नसलेल्‍या चोरट्यांनी ९ लाखांचे हिरे चक्‍क फोडून फेकले
Published on
Updated on

हिरे ओळखण्याकरिता पारखी नजर असावी लागते असं म्हंटलं जातं. हिर्‍याची पारख करता आली तरच खरा हिरा ओळखता येतो. याचा प्रत्यय नुकताच नागपुरात आला आहे. आपण चोरलेले हे हिरे आहेत हे समजलेच नसल्याने एका आंतरराज्यीय टोळीतील लुटारूंनी तब्बल ९ लाखांचे हिरे अक्षरशः फोडून टाकले. काचा फोडाव्यात तसे या चोरट्यांनी हिरे फोडून फेकून दिले. चोरीतील सोनं मात्र वितळवून विकले. ९ लाखांचे हिरे फोडून फेकणाऱ्या चोरांमुळे हिऱ्यांची पारख असावी लागते हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

आंतरराज्यीय टोळीला आसाममध्ये जाऊन अटक

नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आंतरराज्यीय टोळीला आसाममध्ये जाऊन अटक केली. ही टोळी धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलांच्या पर्स चोरत असे. पोलिसांनी या चोरट्यांजवळून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलांच्या पर्स लांबिवणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने आसाममध्ये जाऊन अटक केली.

२० दिवस पोलिस पथक आसाममध्ये तळ ठोकून

त्यासाठी तब्बल २० दिवस पोलिस पथक आसाममध्ये तळ ठोकून होते. या चोरट्यांजवळून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नागपूर लोहमार्ग पोलिस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील गोंदिया लोहमार्ग पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून हावड्याकरून येणाऱ्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

हे चोरटे महिलांच्या पर्स लांबवत होते. चोरीच्या वाढत्या घटना पाहून लोहमार्ग पोलिसांनी या चोऱ्यांचा तपास करायला गुन्हे शाखेचे पथक गठीत केले होते.

पथकाने घडलेल्या गुन्ह्याच्या वेळ‌ा, रेल्वेचा आरक्षण तक्ता, ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज यांचा अभ्यास केला असता आरोपी आसाममधील असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी एसी कोचमध्ये आरक्षण करून प्रवास करायचे

त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी आसामला जाऊन तपास सुरू केला व नयनमुनी चंद्रकांता मेधी (वय २६), दीपज्योती चंद्रकांत मेधी (२२) व संजू रामनाराण राय (२८) या तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले.

हे आरोपी एसी कोचमध्ये आरक्षण करून प्रवास करायचे व वाटेत महिला प्रवाशांच्या पर्स लांबवायचे.

त्यांच्या जवळून १० लाख ६० हजार ३८३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चोरलेले सोन्याचे दागिने त्यांनी वितळवून घेतले होते.

आरोपींनी चोरलेल्या साहित्यात ९ लाख रुपयांचे हिरे होते, मात्र त्यांना ते न कळल्यामुळे त्यातून सोने निघते का हे पाहण्यासाठी त्यांनी हिरे फोडून फेकून दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, महेंद्र मानकर, रविकांत इंगळे, अनिल जगवे, गिरीश राऊत, रोशन अली, चंद्रशेखर मदनकर, संदीप लहासे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news