नागपूर ; पुढारी वृत्तसेवा पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. 17 एप्रिल रोजी प्रचार तोफा थंड होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे शेवटचे पाच दिवस आहेत. उद्या 14 एप्रिलला प्रचाराचा सर्वपक्षीय धुरळा सुपर संडेच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी, भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूर्व विदर्भात आहेत. राहुल गांधी यांची ही राज्यातील पहिलीच प्रचार सभा असल्याने पूर्वतयारी जोरात असताना पावसाचे सावट आहे.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर व रामटेक मतदारसंघात जाहीर सभा झाल्या. 20 रोजी दुसऱ्या टप्प्यात ते वर्धा मतदारसंघात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन-चार दिवस पूर्व विदर्भात मोठ्या नेत्यांच्या सभा पाहायला मिळणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गोंदिया मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात रामटेक मतदार संघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी तीन सभा घेतल्या. काल चंद्रपूर, गडचिरोलीला त्यांनी जाहीर सभा घेतल्या.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा देखील दौरा विदर्भात होणार आहे. मात्र आतापर्यंत केवळ खर्गे यांचाच अधिकृत दौरा आला. गेल्यावेळी चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसच्या पदरात पडली. यावेळी महाविकास आघाडीला अधिक जागा मिळतील असा विश्वास आहे. काँग्रेस एकजुटीने कामाला लागल्याचे चित्र आहे. या सभेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, भंडारा मतदारसंघ उमेदवार डॉ प्रशांत पडोळे, गडचिरोली मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :