नागपूर : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचे पोस्टर्स फाडले

नागपूर : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचे पोस्टर्स फाडले

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी निघाले. याचवेळी नागपुरात कर्नाटकवाद पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले. पर्यटकांनो सर्वांगसुंदर कर्नाटक बघायला या, अशा आशयाचे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे छायाचित्र असलेले बॅनर, होर्डिंग्ज विमानतळ मार्गावर लागले. हा योगायोग की जाणीवपूर्वक ही पोस्टरबाजी करण्यात आली यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. दरम्‍यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे हे पोस्टर्स फाडण्यात आले.

या वेळी कर्नाटक सरकार मुर्दाबादची घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्‍न पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेले पोस्टर एकीकडे तर शिंदे गटाचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे पोस्टर असे पोस्टरयुद्ध आज नागपुरात पहायला मिळाले.

गेले काही दिवस मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही वारंवार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात कर्नाटक सरकारचे होर्डिंग मुद्दाम लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news