कोपरगाव : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप व्यवस्थापकाचा चाकूने भोसकून खून

कोपरगाव : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप व्यवस्थापकाचा चाकूने भोसकून खून

महेश जोशी

कोपरगाव : तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गवर असलेल्या गुरुराज एच. पी पेट्रोल पंप व्यवस्थापकाचा अज्ञात तीन व्यक्तींनी किरकोळ कारणावरून चाकून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना २९ जून रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका हॉटेल कर्मचाऱ्यालाही चाकू मारल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला शिर्डी येथे रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेतील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोन व्यक्ती फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भोजराज बाबुराव घनघाव (वय 40, रा. दहेगाव बोलका, ता. कोपरगाव) असे मयत व्यवस्थापकाचे नाव आहे. तर दत्तात्रय मोरे असे जखमीचे नाव असून त्याला शिर्डी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार, नागपूर-मुंबई महामार्गवरील संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोल पंपावर तीन अनोळखी व्यक्तींनी मोटरसायकलवर येऊन कर्मचारी अमोल धोंडीराम मोहिते (वय 25, रा गुरुराज एचपी गॅस एजन्सी, संवत्सर शिवार ता. कोपरगाव) यांना धक्काबुक्की करून कानाखाली मारली त्यामुळे व्यवस्थापक घनगाव हे तेथे आले आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीला विचारले तू माझ्या माणसाला का मारहाण केली. याच्या रागातून त्यातील दोन व्यक्तींनी त्यास मारून टाक सोडू नको असे म्हणत त्यातील एका व्यक्तीने त्याच्या जवळील धारदार चाकू काढून व्यवस्थापकाची गचांडी धरून चाकूने त्याच्या पोटात आणि खांद्यावर वार करून ठार मारले. या घटनेनंतर तीनही व्यक्ती पळून गेले.

याबाबत पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर तीन अज्ञात आरोपी आणि त्यांनी केलेली झटापट कैद झाली आहे. त्याचवेळी संवत्सर शिवारात गस्त घालत असणारे ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि त्यांच्या सहकार्यासह ते घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून त्यांनी तातडीने तपासाची चक्र फिरवून अर्ध्या तासात एका आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहे. शिर्डी उपविभागाचे पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे भरत दाते यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news