Sreeshankar : लांब उडीत मुरली श्रीशंकरने रचला इतिहास!

Sreeshankar : लांब उडीत मुरली श्रीशंकरने रचला इतिहास!
Published on
Updated on

पॅरिस; वृत्तसंस्था : भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने शुक्रवारी पॅरिस डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 8.09 मीटर उडी मारून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीशंकरने शुक्रवारी रात्री तिसर्‍या प्रयत्नात दिवसातील सर्वोत्तम उडी मारली. डायमंड लीग स्पर्धेत टॉप-3 मध्ये स्थान मिळवणारा श्रीशंकर हा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी केवळ टोकिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि थाळीफेकपटू विकास गौडा यांनाच ही कामगिरी करता आली होती. (Sreeshankar)

ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक मानांकित ग्रीसच्या एम. टँटोग्लूने (8.13 मी) पहिले स्थान पटकावले. तर जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता स्वित्झर्लंडचा सायमन एहमर (8.11 मी) दुसर्‍या स्थानावर राहिला. मुरली श्रीशंकर तिसर्‍या फेरीनंतर अव्वल स्थानी पोहोचला होता, पण नंतर तो तिसर्‍या क्रमांकावर घसरला. या स्पर्धेदरम्यान विरुद्ध दिशेकडून वाहणार्‍या जोरदार वार्‍याचा श्रीशंकरच्या कामगिरीवर परिणाम झाल्याची चर्चा आहे. (Sreeshankar)

श्रीशंकरने दुसर्‍यांदा डायमंड लीग स्पर्धेत सहभाग नोंदवला. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी मोनॅको येथे सहावे स्थान पटकावले होते. या चमकदार कामगिरीमुळे श्रीशंकरने सप्टेंबरमध्ये यूजीन, यूएसए येथे होणार्‍या डायमंड लीग फायनलसाठी सहा पात्रता गुण मिळवले. यासोबतच त्याने ऑगस्टमध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी महत्त्वाचे गुणही आपल्या खात्यात जमा केले

मूळचा केरळचा असलेल्या श्रीशंकरने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकले होते. यासह तो राष्ट्रकुलमध्ये लांब उडीत पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. यापूर्वी 1978 मध्ये राष्ट्रकुलच्या लांब उडीत भारताला पहिले पदक मिळाले होते. त्यावेळी सुरेश बाबू यांनी चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले होते.

दुखापतीमुळे नीरज चोप्राची माघार

24 वर्षीय श्रीशंकरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम उडी 8.36 मीटर आहे, जी त्याला पार करता आली नाही. आता तो भुवनेश्वर येथे होणार्‍या इंटर-स्टेट मीटसाठी भारतात परतणार आहे. पॅरिस डायमंड लीगमध्ये श्रीशंकर हा भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू होता. भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीमुळे या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले होते.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news