‘नाते तुटल्‍या’नंतरची भावनिक पोकळी पाळीव प्राणी भरून काढतात : मुंबई न्‍यायालयाचे निरीक्षण

‘नाते तुटल्‍या’नंतरची भावनिक पोकळी पाळीव प्राणी भरून काढतात : मुंबई न्‍यायालयाचे निरीक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाळीव प्राणी कौटुंबिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहेत. मानवी नाते संबंध तुटल्यानंतर निर्माण होणारी भावनिक पोकळी पाळीव प्राणी भरून काढतात, असे निरीक्षण नुकतेच मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका पोटगीप्रकरणी अंतरिम आदेश देताना नोंदवले.

काय आहे प्रकरण ?

जोडप्याचे १९८६ मध्‍ये लग्न झाले. दाम्‍पत्‍याला दोन मुली आहेत. त्या परदेशात स्थायिक आहेत. २०२१ मध्ये पती- पत्‍नीमध्‍ये मतभेद निर्माण झाले. पतीने आपल्या ५५ वर्षीय पत्नीला मुंबईला पाठवले. तसेच तिला देखभाल आणि इतर मूलभूत गरजा पुरवू, असे आश्वासन दिले. हे आश्वासन पाळले नाही. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदातील कलम १२ अंतर्गत पत्‍नीने पोटगीच्‍या मागणीसाठी अर्ज केला होता. प्रति महिना ७० हजार रुपये पोटगी द्‍यावी, अशी तिने मागणी केली होती.

पाळीव प्राणी कौटुंबिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग

पोटगीमध्‍ये पत्‍नीच्‍या पाळीव कुत्र्यांच्या देखभालीसाठीच्‍या खर्चाचा समावेश नसावा, अशी मागणी करणारी याचिका पतीने दाखल केली होती. यावर मुंबईतील महानगर दंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांच्‍यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले की, पाळीव प्राणी देखील कौटुंबिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी पाळीव प्राणी आवश्यक आहेत कारण ते तुटलेल्या नातेसंबंधांमुळे निर्माण झालेली भावनिक पोकळी भरून काढतात.

प्रतिमहिना ५० हजार रुपये पाेटगी देण्‍याचे निर्देश

पोटगीमध्‍ये पत्‍नीच्‍या तीन पाळीव कुत्र्यांच्या देखभालीसाठीच्‍या खर्चाचा समावेश नसावा, अशी मागणी पतीने केली होती.
न्‍यायालयाने ही मागणी फेटाळून लावत पत्नीला दिलेली पोटगी तिच्या जीवनशैली आणि इतर गरजांशी सुसंगत असावी, असे स्‍पष्‍ट केले. संबंधित महिलेकडे तीन रॉटवेलर कुत्रे आहेत. ती तिच्‍यावरच अवलंबून आहेत, त्‍यामुळे पतीला पोटगीमध्‍ये त्‍यांचाही खर्च द्‍यावा लागेल, असे स्‍पष्‍ट करत न्‍यायालयाने पतीची याचिका फेटाळली. तसेच मुख्य प्रकरण निकाली निघेपर्यंत पतीने पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून प्रतिमहिना ५० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news