MP Election : कोण आहेत ‘मिर्ची बाबा’? अखिलेश यांना भेटल्‍यामुळे आले चर्चेत

MP Election : कोण आहेत ‘मिर्ची बाबा’? अखिलेश यांना भेटल्‍यामुळे आले चर्चेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्‍यातील प्रमुख लढत होत असताना राज्‍यात समाजवादी पार्टीनेही आपले अस्‍तित्‍व दाखविण्‍यासाठी कंबर कसली आहे. अशातच नुकताच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि मिर्ची बाबा (Mirchi Baba) ऊर्फ ​​राकेश दुबे यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भेटीत यादव यांनी मिर्ची बाबांना निवडणूक लढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी दिलेल्‍या 'राजकीय' शुभेच्छानंतर मिर्ची बाबा राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

MP Election : कोण आहेत मिर्ची बाबा?

मिर्ची बाबा ऊर्फ ​​राकेश दुबे हे मुळचे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बिरखडी गावचे. त्यांचे वडील मालनपूर येथील मंदिरात पुजारी होते. 1997 मध्ये मिर्ची बाबा फक्त तेल गिरणीत कामगार म्हणून काम करत होते. याचवे‍‍‍ळी गावातील जमीन विकून त्यांंनी ट्रक घेतला. यात तोटा झाला. ट्रक विकावा लागला. यानंतर ते गुजरातला गेले. अहमदाबादमधील एका खासगी मिलमध्ये काम करु लागले. येथेच ते  एका साधूच्या सहवासात आले. यानंतर राकेश दुबे यांनी आपले नाव बदलून वैरागानंद गिरी असे ठेवले. हळूहळू त्यांची ख्याती मध्य प्रदेशातील गावागावात वाढू लागली.

मिर्ची बाबा नाव कसे पडले?

स्वामी वैरागानंद गिरी हे आपल्या भक्तांना मिरची पावडर पाजत असत. यावरुन त्‍यांचे नाव मिर्ची बाबा असे पडले. या काळात काँग्रेस नेत्यांशी त्‍यांची मैत्री वाढली. ते माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या संपर्कात आले. मिर्ची बाबा यांच्‍याशी संबंधित दावा करतात की, दिग्विजय सिंह यांनी मिर्ची बाबांना मीनल रेसिडेन्सी भोपाळ येथे बंगाल मिळविण्यात मदत केली. तत्कालीन काँग्रेस सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदार त्‍यांच्‍या संपर्कात असल्‍याची चर्चा  आहे.

जलसमाधीची घोषणा… पण…

2018 मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर मिर्ची बाबा यांना महामंडळाचे अध्यक्ष बनवून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यानंतरही मिर्ची बाबांनी दिग्विजय हरले तर जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले हाेते. ही निवडणूक दिग्विजय सिंग जिंकले.

काँग्रेस सरकार पडल्‍यानंतर मिर्ची बाबांना 'बुरे दिन'

मिर्ची बाबांनी गायींच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सात दिवस उपोषण केले होते. मात्र सरकारने त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना गोमूत्र आणि गंगाजल अर्पण केल्यानंतर त्यांनी उपोषण साेडवले. कमलनाथ सरकार पडल्यानंतर मिर्ची बाबा यांचे बुरे दिन सुरु झाले. 2022 मध्ये म्‍हणजे मागील वर्षी एका 29 वर्षीय महिलेने मिर्ची बाबाने दारू पिऊन बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्‍यांना अटकही झाली. सुमारे 13 महिने मिर्ची बाबा तुरुंगात होते. नंतर न्यायालयाने त्यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या काळात काँग्रेस सरकारशी त्यांची कटुता वाढल्‍याचे मानले जाते. याप्रकरणी काँग्रेसने साथ दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता त्‍यांची समाजवादी पार्टीची जवळीक वाढल्‍याचे मानले  जात  आहे.

MP Election : मिर्ची बाबा निवडणूक रिंगणात उतरणार ?

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या ट्विटनंतर मिर्ची बाबा कुठून निवडणूक लढवणार याबाबत साशंकता आहे. ते मध्‍य प्रदेंशचे मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्याविरोधात बुधनी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, ते छिंदवाडामधून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्‍याची शक्यता आहे. कारण जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते कमलनाथ यांनी 'अखिलेश यादव कोण आहे' असे  प्रश्‍न विचारला हाेता. त्‍यामुळे आता समाजवादी पार्टी कमलनाथ यांना आव्‍हान देण्‍यासाठी मिर्ची बाबांना उमेदवारी देतील, असे मानले जाते.मात्र, या संपूर्ण प्रकरणात मिर्ची बाबाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news