खासदार नवनीत राणा यांची संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी

खासदार नवनीत राणा यांची संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हनुमान चालीसा प्रकरणी तुरुंगवास सहन करावा लागल्यानंतर सोमवारी (दि. २३) दुपारी खासदार नवनीत राणा कौर यांनी संसदीय अधिकार समिती समोर हजर राहून लिखित जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. समितीने राणा यांची तक्रार ऐकूण घेत त्यांनी केलेल्या आरोपासंबंधी जबाब नोंदवून घेतल्याचे समजते आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' समोर हनुमान चालीसा पठणाचा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या राणा दाम्पत्याकडून देण्यात आल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. याप्रकरणी राणा तसेच त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक करीत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

नवनीत राणा यांनी अटकेला बेकायदेशीर ठरवत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमानवीय व्यवहार केल्याचा आरोप केला होता.तुरुंगात बाहेर आल्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेवून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली होती. लोकसभा सचिवालयाने देखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृह मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान संसदीय समितीसमोर हजर राहण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसोबत राणा यांनी संवाद साधला.तुरुंगात करण्यात आलेला छळ तसेच ज्यांच्याकडून छळ करण्यात आला यासंबंधीची माहिती समितीसमोर मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यासह ज्या ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी त्रास दिला त्यांसंबंधी जबाब नोंदवण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

'माझ्यावर जो अत्याचार झाला,तसा अत्याचार इतर कोणावर होऊ नये, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच लोकसभा सदस्य म्हणून मला जो अधिकार आहे त्याचा मी वापर करणार आहे.संविधानाचा खून करत माझ्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबत आदेश देणाऱ्यांनाही आता उत्तर द्यावे लागणार आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news