मुंबई, पुढारी वृत्तसेवा : खासदार इम्तियाज जलील यांनी आज (दि.२८) पत्रकार परिषद घेत माझ्यावर उद्योगमंत्री असताना औद्योगिक जमिनींचा घोटाळा केला, असा आरोप केला. आरोप करताना त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे दिलेले नाहीत. खासदार जलील यांचे आरोप निराधार आहेत. मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.
खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषद घेत सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुभाष देसाई यांनी उद्योगमंत्री असताना औद्योगिक जमिनींचा घोटाळा केला, असा आरोप जलील यांनी केला होता. यावर सुभाष देसाई म्हणाले की, "माझ्यावर आरोप करून चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचाच हा प्रयत्न आहे. इम्तियाज जलील यांनी हे आरोप त्वरित मागे घेऊन माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा व नुकसान भरपाईचा खटला दाखल करणार," असा इशारा सुभाष देसाई यांनी दिला आहे. सुभाष देसाई यांच्या प्रत्युत्तरानंतर खा. जलील काय भूमिका घेतात? यावर सर्वांचे लक्ष्य आहे.