Morocco Earthquake | मोरोक्कोतील भूकंपबळींचा आकडा ६३२ वर, शतकामधील सर्वात शक्तिशाली भूंकपाने ऐतिहासिक मराकेश शहराची मोठी हानी

Morocco Earthquake | मोरोक्कोतील भूकंपबळींचा आकडा ६३२ वर, शतकामधील सर्वात शक्तिशाली भूंकपाने ऐतिहासिक मराकेश शहराची मोठी हानी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोत शक्तीशाली भूकंपाने मोठी जीवितहानी झाली आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांचा आकडा ६३२ वर पोहोचला आहे. तर यात ३२९ लोक जखमी झाले आहेत. यातील ५० जणांची प्रकृती गंभीर आहे, असे वृत्त मोरोक्कोचे सरकारी टीव्ही स्टेशन अल औलाने इंटेरियर मंत्रालयाचा हवाल्याने दिले आहे. येथील मृताचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती. हा भूकंप देशातील या शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे, असे मोरोक्कोमधील नॅशनल जिओफिजिक्स इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. (Morocco Earthquake)

यामुळे ऐतिहासिक मराकेश शहरातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. या शक्तीशाली भूकंपाच्या हादऱ्यानंतर लोक घरातून रस्त्यावर आले. त्यांना भूकंपाच्या भितीने रात्र रस्त्यावरच काढावी लागली. या भूकंपाचा मराकेश शहराजवळील मोरोक्कोच्या मध्यभागी असलेल्या ॲटलस पर्वतावरील सहा प्रांतांना धक्का बसला आहे. भूकंपानंतर लोकांनी घरातून बाहेर पडून रस्त्यावर गर्दी केली.

आमचे शेजारी ढिगार्‍याखाली….

भूकंपाचा केंद्रबिंदूपासून असलेल्या अस्नी या डोंगराळ भागातील रहिवाशांनी या भूकंपाने लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अस्नी गावातील रहिवासी मोन्तासीर इत्री यांनी सांगितले की, ते रहात असलेल्या भागातील बहुतांश घरे कोसळली आहे. "आमचे शेजारी ढिगार्‍याखाली अडकले आहेत आणि लोक गावातील उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांना वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत," असे त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

अवघ्या २० सेकंदात होत्याचे नव्हते झाले

ताराउदंट ठिकाणाजवळ रहात असलेले आणि पेशाने शिक्षक असलेले हमीद अफकर म्हणाले की भूकंपाच्या हादऱ्याने आपण घरातून पडलो. सुमारे २० सेकंद हादरे बसले. आपण जेव्हा दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरलो तेव्हा भूकंपाच्या हादऱ्याने घराच्या दरवाज्यांची उघडझाप झाली.

८० लाख ते १ कोटी लोक प्रभावित

अलजझिराच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे ८० लाख ते १ कोटी लोक प्रभावित झाले आहेत. मुख्यतः जे लोक ग्रामीण भागात पर्यावरणीय पर्यटनावर उदरनिर्वाह करतात त्या लोकांना याचा अधिक फटका बसला आहे. मराकेशमधील रहिवासी असलेल्या मोहम्मद यांनी सांगितले की, भूकंप झाला तेव्हा ते त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या अपार्टमेंटमध्ये होते. "हादरे जाणवल्यानंतर आपण इमारतीतून बाहेर आलो आणि स्वतःला वाचवले." येथील अनेक इमारती कोसळल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मराकेशच्या उपनगरांना भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागात आणि बाहेरील भागात सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्व्हे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:११ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी होती. मोरोक्कोच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग अँड अलर्ट नेटवर्कने या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर ७ इतकी नोंदवली गेली असल्याचे म्हटले आहे. भूगर्भीय सर्व्हे विभागाने १९ मिनिटांनंतर ४.९ तीव्रतेचा धक्का बसल्याची नोंद केली.

शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मॅराकेचच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर (४३.५ मैल) ॲटलस पर्वतावर होता. हा केंद्रबिंदू उत्तर आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर तौबकल आणि प्रसिद्ध मोरोक्कन स्की रिसॉर्ट ओकेमेडेन जवळ आहे.

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्व्हेकडून सांगण्यात आले आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १८ किलोमीटर (११ मैल) खोल भूगर्भात होता, तर मोरोक्कोच्या भूकंपमापन एजन्सीने तो ८ किलोमीटर (५ मैल) खोलवर असल्याचे म्हटले आहे. (Morocco Earthquake)

पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत भूकंपाचा हादरे

पोर्तुगीज इन्स्टिट्यूट फॉर सी अँड अॅटमॉस्फियर आणि अल्जेरियाच्या नागरी संरक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवले. सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही व्हिडिओत काही इमारत कोसळताना दिसत असून रस्त्यांवर ढिगारे पडले आहे. काही व्हिडिओत भूकंपाच्या हादऱ्यानंतर लोक सुरक्षेसाठी शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट्स आणि अपार्टमेंट इमारतींमधून बाहेर पडून धावताना दिसून आले आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news