९ ते १७ वयोगटातील मुलांना लागलंय मोबाईलच ‘वेड’! जाणून घ्‍या नवीन सर्वेक्षण काय सांगते?

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुन्‍हा मोबाईल घेतलास का? मोबाईल फोनशिवाय तुला काही सूचत नाही का ? अवघड आहे कसं होणार या पोरांचं ? हे प्रश्‍न आणि यातून होणारा त्रागा हा आता 'काहानी घर घर की' आहे. मागील काही वर्षात स्‍मार्ट फोनने सर्वच वयोगटाचे संपूर्ण जगणं व्‍यापले आहे. मात्र याच्‍या वापरात आघाडीवर आहेत ती ९ ते १७ वयोगटातील मुले. कारण याच वयोगटातील देशातील ६० टक्‍के मुले ही सोशल मीडिया किंवा गेमिंग ( Social Media and gaming ) प्लॅटफॉर्मवर दररोज तीन तासांपेक्षा अधिक वेळ घालवतात, असे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात दिसून आले आहे. जाणून घेवूया मुलांच्‍या मोबाईल वापराबाबत नवीन सर्वेक्षण काय सांगते याविषयी.

देशातील सुमारे ९३ टक्‍के लोक आता इंटरनेटशी जोडले गेले आहेत. यातील सुमारे ६० टक्‍के म्‍हणजे ४.८ अब्‍ज लोक हे सोशल मीडियाचे वापरकर्ते आहेत. यामध्‍ये तरुणाईचा सहभाग लक्षणीय आहे.

Social Media and gaming : तब्‍बल ५० हजार पालकांच्‍या मुलाखती

मागील काही सर्वेक्षण आणि अभ्‍यासांमध्‍ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात होणारा वापरामुळे मुले नैराश्‍याच्‍या गर्ते जात असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले हाेते. आता नुकत्‍याच झालेल्‍या राष्ट्रीय सर्वेक्षणात भारतातील जवळपास 50,000 पालकांच्या मुलाखती घेण्‍यात आल्‍या. यामध्‍ये असे आढळले की, ९ ते १७ वयोगटातील दहापैकी सहा मुले ही सोशल मीडिया किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर दररोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात

महाराष्‍ट्रातील मुले दररोज सहा तासांपेक्षा अधिक वेळ असतात ऑनलाईन

Mobile
Mobile

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्‍या महाराष्‍ट्रातील १७ टक्‍के पालकांनी सांगितले की, त्यांची मुले दररोज सहा तासांपेक्षा जास्त ऑनलाइन असतात. फक्त १० टक्के पालकांनी सोशल मीडिया किंवा गेमिंगचा मुलांवर सकारात्‍मक परिणाम होत असल्‍याचे मत नोंदवले आहे. सर्वेक्षणात स्पष्टपणे दिसून आले की, सोशल मीडिया सकारात्मक प्रभावांपेक्षा नकारात्मक परिणाम अधिक आहेत. या राष्‍ट्रीय सर्वेक्षणातील निष्‍कर्ष हे अमेरिकेतील मागील वर्षी म्‍हणजे २०२२ मध्‍ये केलेल्‍या सर्वेक्षणासारखेच आहेत. तसेच कुटुंब आणि सरकारने मुलांच्‍या मोबाईल फोन वापरावर मर्यादा आणण्‍यासाठी उपाययाेजना आखाव्‍यात अशीही सूचना केली आहे.

मानसिक आरोग्‍यावर विपरित परिणाम

Child & Mobile Phones
Child & Mobile Phones

नुकतचेच LocalCircles या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, सोशल मीडियावर दीर्घकाळ गुंतल्याने आक्रमकता, सतत बैचैन राहणे, अतिक्रियाशीलता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांची शक्यता वाढते. सुमारे ३७ टक्के पालकांनी सोशल मीडियासह OTT प्लॅटफॉर्मदेखील त्यांच्या मुलांचा आवडता मनोरंजनाचा भाग असल्‍याचे सांगतात.

९ ते १८ वर्षे वयोगटातील मुले गॅजेट्सचे व्यसनच्‍या जाळ्यात अडकल्‍याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. ही मुले इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यात, गेम खेळण्यात अधिक वेळ घालवत आहेत. कोरोना काळात शाळा बंद असताना हे समजून घेतले गेले. मात्र आता शाळा सुरू झाल्यानंतरही मुलांवर मोबाईलचे वेड अधिक वाढताना दिसत आहे. मुले स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असल्‍याने त्‍यांना डोकेदुखी, पाठदुखी, चिंता यांसारख्या शारीरिक समस्या निर्माण होत असल्‍याचेही पालकांनी आपल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हटले आहे.

पालक कोणत्‍या उपाययोजना करु शकतात ?

सोशल मीडिया आणि प्रदीर्घ स्क्रीन वेळ याविषयीची चिंता वेळोवेळी व्यक्त केली गेली आहे. अलीकडील अनेक संशोधनात मोबाईल फोनचा भावी पिढीवर होणारा परिणाम हा अधिक चिंताजनक असल्‍याचेही नमूद करण्‍यात आले आहे. आता सोशल मीडिया पूर्णपणे बंद करणे अशक्‍य असले तरी मुलांशी त्‍याचा शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर होणार्‍या परिणमांविषयी बोलणे, स्क्रीन टाइमची मर्यादा निश्चित करणे आणि त्यांना जबाबदारीने इंटरनेट कसे वापरावे हे शिकवणे, असे सकारात्मक उपाय पालकांनी करणे ही काळाची गरज आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news