आयटी कंपनीमध्ये मुनलायटिंग हा विषय काय नवा नाही आहे; पण हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी विप्रो कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी (दि.२१) विप्रोने आपल्या कंपनीतून मुनलायटिंगच्या नावाखाली तब्बल ३०० जणांना नोकरीवरुन काढले आहे. हे ३०० जण विप्रोची स्पर्धक असलेल्या कंपनीत विप्रोमध्ये जे काम करत होते तेच काम करत होते. हे कार्यनिष्ठतेच्या नियमात बसत नाही, या कारणास्तव विप्रोने या ३०० जणांना शिस्तभंगाची कारवाई करत कामावरुन काढून टाकले. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना 'नो डबल लाइव्ह्स' (No Double Live) या नावाचा ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये म्हटलं होतं की, एकाचवेळी दोन ठिकाणी काम करत असाल आणि ते कंपनीच्या लक्षातआल्यास त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच नोकरी गमवली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला हाेता. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पत्रामध्ये असे लिहिले आहे की, कोणताही कर्मचारी कंपनीच्या परवानगी घेतल्याशिवाय पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करू शकत नाही.