थकबाकीदार हाउसिंग सोसायट्यांना नोटिसा, महापालिका करसंकलन विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये | पुढारी

थकबाकीदार हाउसिंग सोसायट्यांना नोटिसा, महापालिका करसंकलन विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील हाउसिंग सोसायटीमधील 50 टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकाधारकांनी मिळकतकर न भरल्यास सदनिका जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने केली जाणार आहे. अशा शहरातील 600 पेक्षा अधिक हाउसिंग सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. थकीत मिळकतकर वसुलीसाठी करसंकलन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी शहरातील 5 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या विशेषत: बिगरनिवासी मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीस देण्यात आल्या आहेत. ही जप्ती कारवाई सुरू आहे.

आता, थकबाकी असलेल्या सदनिकाधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. वाकड, थेरगाव, सांगवी, मोशी, चर्‍होली या करसंकलन विभागीय कार्यालयाने या नोटिसा दिल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुदतीमध्ये मिळकतकराचे बिल न भरल्यास सदनिका जप्त करून त्याला सील लावले जाणार आहे. त्यासाठी विशेष स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या नोटिसा सदनिकाधारकांसह सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना देण्यात आल्या आहेत. सदनिका जप्त केल्यानंतर पाणीपुरवठाही खंडित केला जाणार आहे. करसंकलन विभागाच्या पथकास सोसायटीत प्रवेश न दिल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.  सदनिकाधारकांनी मुदतीमध्ये थकीत व मूळ मिळकतकर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Back to top button