मान्सून 25 जूननंतरच जोर धरणार ; बिपरजॉय चक्रीवादळाने खेचून घेतली आर्द्रता

मान्सून 25 जूननंतरच जोर धरणार ; बिपरजॉय चक्रीवादळाने  खेचून घेतली आर्द्रता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयापलीकडे न गेल्याने मान्सून अत्यंत क्षीण झाला आहे. सध्या तो तळकोकणात असला, तरीही बिपरजॉय चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली. त्यामुळेही पुढे जाण्याइतका जोर सध्या नाही. त्यामुळे तो 25 जूननंतरच जोर धरेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.

जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरीही राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. मान्सूनची नेमकी स्थिती कशी आहे, तो कुठे आहे, तो का पुढे सरकत नाही याबाबत पुणे हवामान विभागातील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, मान्सूनचा अंदाज पाहता अजून किमान दोन आठवडे तो जोर धरेल, असे वाटत नाही. 25 जूनपर्यंत तो जोर धरेल अशी शक्यता आहे.

पश्चिमी वारे हिमालयाकडे न सरकल्याचा परिणाम

मान्सून सक्रिय होतो तेव्हा वरच्या थरात किमान 12 कि.मी. उंचीवरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहते. ते वारे हिमालय पर्वत पार करते तेव्हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मान्सून स्थिरावतो. मात्र, यंदा जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी पश्चिमी वार्‍यांनी हिमालय पार केलेला नाही, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

विदर्भ, कोकणात हलका पाऊस
मंगळवारी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 15 जूनपर्यंत राज्यात फक्त विदर्भ आणि कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. विदर्भात दिवसा कडक ऊन व सायंकाळी हलका पाऊस असे वातावरण राहील. त्या भागात अजूनही उष्णतेची लाट सक्रिय आहे.

बिपरजॉयने पळवली आर्द्रता
मान्सून दरवर्षी 7 ते 8 जूनपर्यंत तळकोकणात व पुढे 10 ते 11 जून मुंबई आणि 15 जूनपर्यंत महाराष्ट्र गाठतो. मात्र, यंदा अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनच्या वार्‍यामधील आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सूनचा प्रवास थबकला आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news