सोलापूर : शेतकर्यांनो चिंता करू नका, यंदा पाऊस समाधानकारक बरसेल. साधारणतः १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करेल. तेथून ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या सप्ताहापर्यंत मुबलक पाऊस होईल, असा अंदाज दाते पंचांगात व्यक्त करण्यात आला आहे.
चैत्र पाडव्यापासून नव्या मराठी वर्षाची सुरुवात होते. त्यादिवशी नवे पंचाग पूजन करण्यात येते. विक्रम संवत् २०८० – ८१ म्हणजेच सन २०२४ – २५ च्या नवीन दाते पंचांगात हा पर्जन्यविचार मांडण्यात आला आहे. यासाठी पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचे सहकार्य लाभल्याचे दाते पंचांगात म्हटले आहे. Monsoon News
साधारणतः २२ जून ते १० ऑगस्ट या काळात मुबलक पर्जन्यवृष्टी होईल. यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत होईल. १० ऑगस्टपासून ५ सप्टेंबरपर्यंत पर्जन्यमान मध्यम राहील. मात्र, त्यानंतर २० सप्टेंबरपासून पाऊस ओढ धरेल. २० ऑक्टोबरपर्यंत सरासरीइतका पाऊस होईल. त्यानंतर १ ते १५ नोव्हेंबर या काळात अपेक्षित पाऊस होईल, असेही दाते पंचांगात म्हटले आहे. Monsoon News
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, हस्त व चित्रा नक्षत्रातील पाऊस चांगला बरसेल. एकूणच यंदाच्या पावसाळ्यात मुबलक पर्जन्यमान होईल, असे दाते पंचागांत नमूद करण्यात आले आहे.
नव्या संवत्सरात लग्न व मुंजीचे मुबलक मुहूर्त असल्याचे पंचांगात दिसून येते. लग्न किंवा मुंज कार्यासाठी मुख्य कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे. त्यानंतरच गौण किंवा चातुर्मासकालातील मुहूर्तांचा विचार करावा. आवश्यकता वाटल्यास गुरू किंवा शुक्र यांच्या अस्तकालातील (आपत्कालातील) मुहूर्ताचा विचार करावा, असे पंचांगात नमूद करण्यात आले आहे.
यंदाची संक्रांत मंगळवार दि. १४ जानेवारी २०२५ रोजी आहे. याकाळात स्त्रियांनी नवीन भांडी, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यापैकी शक्य ते यथाशक्ति दान करावे, असे दाते पंचांगात म्हटले आहे. दरवर्षी मकर संक्रांतीसंदर्भात अशुभ सारख्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे पंचागकर्ते ओंकार दाते यांनी सांगितले.
हेही वाचा