पुणे : समुद्राच्या किनारपट्टीवरील वाढती लोकसंख्या, त्यामुळे होणारे वाढते हरित वायुउत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या 50 वर्षांत अरबी समुद्राची पातळी 0.76 मीटर म्हणजे सुमारे अडीच फुटांनी वाढली आहे. यामुळे मान्सून लहरी बनतोय, असा दावा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या पुण्याच्या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्वप्ना पानिकल यांनी केला आहे. त्यांच्या संशोधनानुसार वातावरणातील तब्बल 93 टक्के उष्णता समुद्र शोषून घेत असल्याने ही वेळ आली आहे.
संबंधित बातम्या :
'उत्तर हिंद महासागराच्या समुद्रांची पातळी, भूतकाळात झालेली आणि भविष्यात होणारी वाढ' या विषयावर डॉ. पानिकल यांनी हा शोधनिबंध मांडला. तो सप्टेंबर महिन्यात जागतिक दर्जाच्या 'सायन्स डायरेक्ट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाला. यात डॉ. पी. ज्योती, आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन यांचाही सहभाग आहे. या शोधनिबंधाने संपूर्ण जगासह भारताला धोक्याची सूचनाच दिली आहे.
या शोधनिबंधात डॉ. पानिकल यांनी दावा केला आहे की, समुद्राच्या पातळीत होणार्या वाढीला किनारपट्टी भागात वाढणारी लोकसंख्या, सतत वाढणारा मानवी हस्तक्षेप, त्यामुळे होणारे सागराच्या पोटातील अंतर्गत बदल जबाबदार आहेत. जागतिक पातळीवर आणि हिंदी महासागरात असे बदल अलीकडच्या 50 वर्षांत वेगाने होत आहेत. एकविसाव्या शतकाच्या अखेरीस उत्तर हिंदी महासागरात मोठे बदल दिसून आले. साधारणपणे 1955 पासून ते 2005 या 50 वर्षांतील समुद्री हवामान आणि त्याच्या पातळीच्या नोंदी तपासल्या असता असे दिसते की, या 50 वर्षांत अरबी समुद्राच्या पातळीत 0.76 मीटर म्हणजे सुमारे 2.5 फुटाने वाढ झाली आहे. जागतिक महासागरात ही वाढ 0.75 मीटर इतकी आहे. याला शास्त्रीय भाषेत थर्मोस्टेरिक पातळी असे म्हटले जाते.
या शोधनिबंधात म्हटले आहे की, मानववंशजन्य हरितगृह वायू (जीएचजी) एरोसोल, ओझोन सांद्रता, जमिनीच्या आच्छादनातील बदल, सौर किरणांचा प्रभाव, ज्वालामुखीय बदल, अल निनो सदर्न ऑसिलेशन, पॅसिफिक डेकॅडल ऑसिलेशन, अटलांटिक मल्टिडेकॅडल ऑसिलेशन या हवामान प्राणालीतील बदलांचा प्रभाव समुद्राच्या पातळीवाढीस कारणीभूत आहे. हिंदी महासागरातील मान्सूनच्या बदलत्या पॅटर्नला ही स्थिती कारणीभूत आहे. हवामान प्रणालीतील सुमारे 93 टक्के अतिरिक्त उष्णता महासागरांद्वारे शोषली जात आहे, ज्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बदलांचा परिणाम समुद्राच्या व महासागरांच्या भरती-ओहोटीवर दिसत आहे.
समुद्राच्या पातळीतील वाढ ही बाह्य दबावामुळे होत आहे. प्रामुख्याने अरबी समुद्राची पातळी 1955 ते 2005 या 50 वर्षांत 0.76 मीटरने वाढ झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
– डॉ. स्वप्ना पानिकल, (वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम, पुणे)
हेही वाचा