Monsoon : ‘मान्सून इज बॅक’! महाराष्ट्रासह 19 राज्यांत मूसळधार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Monsoon - File Photo
Monsoon - File Photo

पुढारी ऑनलाइन डेस्क : Monsoon : शेतकऱ्यासह सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवलेल्या मान्सून जोरदार पुनरागमन करत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस महराष्ट्रासह, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये आज मोठ्या पावसाची शक्यता आहे. तर देशाच्या पूर्वी भागात वीजांच्या गडगडाटासह हलक्या सरी बरसतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Monsoon : मुंबईसह महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने महामुंबईला गुरुवारी चांगलेच झोडपले. मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, कर्जत, कसारा, पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहरासह पालघर, बोईसर, डहाणू आदी भागांत पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सकल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारी सकाळपासून संपूर्ण महामुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.

मुंबईत गुरुवारी झालेल्या पावसामुळे लोकांना उकाड्यापासून थोडा आराम मिळाला. तर पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम दिसून आला. काही ठिकाणी गाड्या स्लिप झाल्याच्या घटनाही घडल्या.

उत्तराखंडला पुन्हा अलर्ट

देशभरात गेल्या महिन्यात मान्सूनने पाठ फिरवली असली तरी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला होता. घर, बंगले अगदी पत्त्यांसारखे कोसळले, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. त्यानंतर गेल्या काही काळापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात पाऊस शांत झाला आहे.

हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये डेहराडूनसह पाच जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने डेहराडून, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ आणि नैनीताल जिल्ह्यात गडगडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय टिपरी, पौडी आणि चम्पावत जिल्ह्यातील काही भागांमध्या हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news