आनंद वार्ता: मान्सूनने राज्याचा बहुतांश भाग व्यापला, कोकण, विदर्भात अतिमुसळधार पाऊस बरसणार

Heavy Rainfall
Heavy Rainfall

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रीय स्थिती आणि उत्तर पूर्व अरबी समुद्रातील चक्रीय स्थिती मान्सून पुढे सरकण्यास पोषक आहे. त्यामुळे शनिवारी मान्सूनने कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील, कोल्हापूर तर विदर्भातील नागपूरपर्यत धडक मारली आहे. येत्या चोवीस तासांत पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान 28 जूनपर्यत राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार, तर मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बीपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनच्या प्रवासास आवश्यक असलेले सर्व बाष्प खेचून घेतल्यामुळे मान्सून गेल्या सुमारे दहा ते बारा दिवसांपासून कोकणातील रत्नागिरीच्या भागात थबकला होता. मात्र, शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनने झपाट्याने प्रगती करीत विदर्भापर्यत मजल मारली आहे. शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन कोल्हापूर, अलिबाग आणि नागपूर पर्यत मान्सूनने वाटचाल केली आहे.

मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झालेले आहे. त्यामध्ये उत्तरपूर्व बंगालचा उपसागर ते ओडिशा, तसेच पश्चिम बंगालपर्यत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या चक्रीय स्थितीचे 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. याबरोबरच उत्तरपूर्व अरबी समुद्र ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यत चक्रीय स्थिती आहे. या दोन्ही स्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. दरम्यान पूर्व मध्य अरबी समुद्र ते म्यानमार पर्यत 40 ते 45 आणि त्यानंतर 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मात्र, त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता नाही, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 28 जूनपर्यत विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार तर कोकणात अतिमुसळधार याशिवाय मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडयात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे.

मान्सूनने शनिवारी पोषक स्थितीमुळे मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, तेलगंण, छत्तीसगड, मध्य प्रदेशाचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेशाचा काही भाग, उत्तराखंडचा बराचसा भाग व्यापून पुढे हिमाचल प्रदेश, जम्मु काश्मीर, लडाख पर्यत धडक मारली आहे. पुढील 24 तासांत बिहार, छत्तीसगडचा उर्वरित भाग, दिल्ली, गुजरात राजस्थान, पंजाब या भागात पोहचणार आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिशा , पश्चिम बंगाल पर्यत चक्रीय स्थिती तसेच अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितीमुळे मान्सूनने शनिवारी अलिबाग, कोल्हापूर, नागपूरपर्यत धडक मारली. येत्या चोवीस तासांत पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्र व्यापणार आहे. तसेच 28 जूनपर्यत राज्यात चांगला पाऊस बरसणार आहे.

– अनुपम कश्यपि- हवामानशास्त्रज्ञ भारतीय हवामानशास्त्र पुणे

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news