Monkeypox : युरोपसह १२ देशांत ‘मंकीपॉक्स’चा फैलाव, WHO ने व्यक्त केली चिंता, बोलावली तातडीची बैठक

Monkeypox : युरोपसह १२ देशांत ‘मंकीपॉक्स’चा फैलाव, WHO ने व्यक्त केली चिंता, बोलावली तातडीची बैठक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

युरोप, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात आता कोरोनानंतर मंकीपॉक्सचा (monkeypox) संसर्ग वाढला आहे. १२ देशांत आतापर्यंत १०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत हा विषाणू कसा पसरत आहे यावर चर्चा केली जाणार आहे. मंकीपॉक्ससाठी कोणतीही विशिष्ट लस नाही, पण स्मॉलपॉक्स लस यापासून ८५ टक्के सुरक्षा देते. कारण दोन्ही विषाणू एकसारखे आहेत. शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, अलीकडील काही दिवसांत मंकीपॉक्सचा उद्रेक तो कधीही न उद्भवलेल्या देशांमध्ये झाला आहे". प्रवासाचा इतिहास नसताना काही लोकांना याचा संसर्ग होत असून खबरदारी घेण्याचा इशारा WHO ने दिला आहे.

आतापर्यंत मंकीपॉक्स युरोपातील ९ देशांत पसरला आहे. यात बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटनचा समावेश आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पण वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा आजार महामारीचे रुप घेणार नाही. याचाच अर्थ असा की कोरोना प्रमाणे मंकीपॉक्सचा फैलाव होणार नाही.

१९७० साली काँगोमध्ये पहिला रुग्ण

स्पेनमध्ये मंकीपॉक्सचे (Monkeypox) ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पोर्तुगालमधील रुग्णसंख्या १४ झाली आहे. स्पेन आढळून आलेले रुग्ण हे पुरुष आहेत. मंकीपॉक्सचा संसर्ग पहिल्यांदा १९५८ मध्ये माकडांमध्ये झाल्याचे आढ‍ळून आले होते. १९७० साली काँगोमध्ये याचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचा पहिला रुग्ण आढळून आला होता. आतापर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला आयसोलेट केले जाऊ शकते. लसदेखील मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव कमी करु शकते. पण WHO चे युरोपियन प्रमुख मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत आहेत. जर लोक उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले तर मंकीपॉक्सचा संसर्ग वाढण्याची अधिक भिती आहे.

लक्षणे काय?

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या माहितीनुसार, चेहऱ्यावर आणि शरीरावर चिकनपॉक्स सारखे पुरळ येण्याआधी ताप, स्नायू दुखणे आदी फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. हा विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शरिरातील द्रव अथवा पुरळ, कपडे आणि बिछाना या माध्यमातून पसरू शकतो. पण घरी असलेले जंतुनाशक हा विषाणू नष्ट करू शकतात. गेल्या दोन आठवड्यांत पोर्तुगाल, स्पेन आणि ब्रिटनमध्ये असे रुग्ण आढ‍ळून आले आहेत. विशेषतः लैंगिक संबंधाच्या माध्यमातून तो उद्भवत आहे, असे सीडीसीचे पॉक्सव्हायरस तज्ज्ञ इंगर डॅमन यांनी म्हटले आहे. शरिरावर लाल रंगाचे पुरळ येणे, डोकेदुखी, अशक्तपणा आदी लक्षणे यामुळे दिसून येतात.

समलिंगी संबंधातून अधिक फैलाव

युरोपात मंकीपॉक्सची प्रकरणे समलिंगी संबंध (men who have sex with men) ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये अधिक आढळून आली आहेत. ब्रिटनमध्ये ६ मे पासून मंकीपॉक्सचे ९ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सी (UKHSA) ने बुधवारी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news