MNS Raj Thackeray : कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय; केंद्राने लक्ष घालावं – राज ठाकरे

MNS Raj Thackeray
MNS Raj Thackeray
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं." असं लिहित मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी एक ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. आणि अखंड महाराष्ट्र असा हॅशटॅग दिला आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रात वातावरण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक 'नोट' शेअर करत म्हंटलं आहे की, आता केंद्राने लक्ष घालावं. वाचा या 'नोट'मध्ये राज ठाकरे यांनी काय म्हटले आहे ते जसेच्या तसे…

MNS Raj Thackeray : हे प्रकरण साधंसोपं नाही…वाचा राज ठाकरेंच्या शब्दात

॥ श्री जय महाराष्ट्र ॥

मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत. ते तात्काळ थांबवा.

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.

राज ठाकरे

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news