बाशिंग बांधलेल्या अजित पवारांना नवरीच मिळेना : आ. शहाजीबापू पाटील

बाशिंग बांधलेल्या अजित पवारांना नवरीच मिळेना : आ. शहाजीबापू पाटील

कराड/सणबूर; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाचा निकाल सरकारच्या बाजूने लागला तरी विरोधक आम्हाला आमदारकीची भीती दाखवत आहेत. जून महिन्यात गुजरातला जातानाच आम्ही आमदारकी सोडून जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आम्हाला आमदारकीची भीती दाखवू नका, असा सज्जड इशारा आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, त्यांना अद्याप नवरीच मिळालेली नाही, अशा शब्दात खिल्ली उडवत आमदार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातील मरळी येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, राज्यात आता पेटवा… आपटलं यासारख्या खालच्या पातळीवरील भाषा विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. दोन ते तीन जण अशी भाषा वापरत आहेत. तरण्याताठा गडी तब्येतीचे कारण सांगून अडीच वर्षे घरात होता. आम्ही गुजरातला निघून गेल्यापासून त्यांचा मणक्याचा आजार कुठे गेला ? हेच समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगात आलेल्या बाईसारखी विरोधकांची वागणूक आहे. खा. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांचे आवाज घुमत असून कर्नाटक निकालानंतर मातोश्रीबाहेर फटाके वाजत आहेत. तर संजय राऊत उड्या मारत आहेत असे सांगत आ. शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टीका केली.

तसेच खासदार शरद पवार यांचे पुतणे माजी अर्थमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, त्यांना नवरीच मिळत नाही. आपण महाविकास सरकार काळात गोरगरिबांच्या आजारपणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी म्हणून 165 पत्रे दिली होती. त्यावेळी केवळ सव्वादोन कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 महिन्यांत गोरगरिबांना आजारपणात मदत व्हावी म्हणून 67 कोटी रुपये दिले आहेत. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्यातील फरक आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हेही विकासकामात कधीच कमी पडत नाहीत. त्यामुळेच आता शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांना 1 लाख मताने विजयी करावे, असे आवाहनही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news