भाजपचा नवा शहराध्यक्ष येत्या आठवड्यात; देवेंद्र फडणवीस उद्या येणार पुण्यात | पुढारी

भाजपचा नवा शहराध्यक्ष येत्या आठवड्यात; देवेंद्र फडणवीस उद्या येणार पुण्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भाजपचा नवीन शहराध्यक्ष या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतील पराभवानंतर कर्नाटकात आज सत्ता गमवावी लागल्याने भाजपचे प्रदेश नेतृत्व अस्वस्थ झाले आहे. पुण्यासारख्या शहरात पक्षाचे खंबीर नेतृत्व असण्याची निकड त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चर्चेतील स्थानिक नेत्यांऐवजी वेगळाच चेहरा समोर येण्याची शक्यताही कार्यकर्त्यांत चर्चिली जात आहे.

सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी प्रथमच पुण्यात येत आहेत. राज्यात येत्या दहा जूनपर्यंत सर्व जिल्हा आणि शहरांमध्ये नवीन शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड करण्यात पक्षाचे प्रदेशातील नेते सध्या व्यग्र आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पुण्यातील पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, आमदार यांच्याशी गेल्या आठवड्यातील पुणे शहरातील नव्या रचनेबाबत संवाद साधला. त्यांचा अहवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ते सादर करतील. काही ठिकाणी विद्यमान शहराध्यक्षांनाही आणखी तीन वर्षांसाठी संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुण्यामध्ये कसबा पेठ विधानसभेच्या निकालानंतर पक्षातील परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे जाणवते. त्या वेळी पुण्यात पुढे आलेले काही स्थानिक नेते आता मागे पडल्याचे दिसून येते. शहराध्यक्षपदासाठी महापालिकेतील माजी सभागृहनेते धीरज घाटे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस असलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र, प्रदेशातील पद दिल्यानंतर त्यांची नियुक्ती होईल की नाही, अशी साशंकता काही नेत्यांनी व्यक्त केली.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाबाबत पूर्वी शहराध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. मात्र, यापुढे आमदारांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात वेळ देण्यास सांगितल्याने आमदारांची नावे मागे पडली. पुण्यात गेली तीन वर्षे पक्षाचे संघटनात्मक कार्य जोमाने पुढे नेणारे विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पुन्हा तीन वर्षांसाठी संधी मिळू शकते. त्यासंदर्भातही कार्यकर्त्यांत गांभीर्याने चर्चा सुरू आहे. पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांतील सुप्त संघर्षामुळे मुळीक यांना पुन्हा संधी मिळू शकते किंवा या सर्वांपेक्षा वेगळाच चेहरा भाजपकडून पुढे आणण्यात येईल. येत्या 20 मेपर्यंत नवीन शहराध्यक्षाची निवड होईल, अशी शक्यता स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांच्या सल्ल्यानेच निर्णय?

फडणवीस, बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतरच पुण्यातील कार्यकारिणी निवडली जाईल. विशेषतः फडणवीस यांचे पुण्यातील संघटनेवर लक्ष असल्याने त्यांच्या सल्ल्यानेच पुण्यातील निर्णय होईल.

Back to top button