आमदार रईस शेख म्हणतात मुंबई महापालिकेचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरु करा!

आमदार रईस शेख म्हणतात मुंबई महापालिकेचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरु करा!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सभा आणि गटनेत्यांची सभा प्रत्यक्षपणे सुरु करण्याची मागणी नगरसेवक व आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढता प्रभावानंतर नगर विकास विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यांच्या सभा ह्या प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेण्याबाबतचे निर्देश दिले होते.

मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असल्याने महापालिकेचा कारभार पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी आमदार रईस शेख यांनी निवेदनातून केली आहे.

रईस शेख यांनी सांगितले की, नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिका आयुक्तांनी महानगरपालिकेच्या सभा, स्थायी समिती, तसेच वैधानिक सभा या ऑनलाईन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचीच अंमलबजावणी अद्यापही सुरू आहे.

त्यानुसार स्थायी समिती सह सर्व इतर वैधानिक व विशेष समित्यांसह सभागृहाचे कामकाज व्हर्च्युअल पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ऑनलाईन केले जाते. गेल्या २ वर्षांपासून महापौरांनी गटनेत्यांची सभा आयोजित केलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रशासनापर्यंत पोहचत नसून भ्रष्टाचार बोकाळत असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

सगळेच सुरळीत आहे तर समित्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणे करा…

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथिल करत लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य नागरीकांना रेल्वेचा प्रवास खुला केला आहे. देशात व परदेशात विमान सेवाही सुरु झालेली आहेत. आयुक्तांच्या दालनात ५०-५० लोकांच्या उपस्थितीत बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील दैनंदिन व्यवहारही १०० टक्के लोकांच्या उपस्थितीत होत आहे.

परंतु एवढे सर्व सुरळीत सुरु असतांना मुंबई महानगरपालिकेच्या सभा व समित्यांच्या सभा या ऑनलाईन असल्यामुळे लोकप्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्यास अडचणी येत आहेत. इतर सर्व जनजीवन सुरळीत असताना लोकप्रतिनिधींना निर्बंध का? असा सवाल यानिमित्ताने शेख यांनी उपस्थित केला आहे. तसेच समित्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणे थेट सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी मुख्यमत्र्यांकडे केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news