सीपीआर रुग्णालयाला मिळणार ८ कोटींची यंत्रसामग्री | पुढारी

सीपीआर रुग्णालयाला मिळणार ८ कोटींची यंत्रसामग्री

कोल्हापूर : अनिल देशमुख

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालयाला कोरोना आणि म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या 8 कोटींची यंत्रसामग्री मिळणार आहे. ती खरेदी करण्यासाठी राज्य योजनेंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत लहान मुले मोठ्या संख्येने प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लहान मुलांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभागापासून आवश्यक ती सर्व तयारी सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी ‘पेडियाट्रिक अँड निओनेटल व्हेंटिलेटर’ची आवश्यकता आहे. यासह अन्य आवश्यक साधनसामग्रीचीही गरज आहे.

राज्य शासनाने तिसर्‍या लाटेतील रुग्णांच्या उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयासाठी कोरोना रुग्णांवरील आवश्यक 7 कोटी 20 लाख 27 हजार रुपयांच्या 338 तर म्युकर मायकोसिसवरील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक 79 लाख 73 हजार रुपयांची पाच अशा एकूण 343 उपकरणांच्या खरेदीला मान्यता दिली आहे.

तिसर्‍या लाटेत लहान मुलांसाठी आवश्यक असलेले 25 पेडियाट्रिक अ‍ॅन्ड निओनेटल व्हेंटिलेटर सीपीआरला मिळणार आहेत. याचीच किंमत सुमारे 4 कोटी 50 लाख रुपये इतकी आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी 40 लाख रुपयांचा ईएनटी एन्डोस्कोप कॅमेराही सीपीआरसाठी उपलब्ध होणार आहे. या सर्व साधनसामग्रीची खरेदी प्रक्रिया सुरू करावी, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्याही सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. यामुळे येत्या महिनाभरात ही यंत्रसामग्री सीपीआरला उपलब्ध होणार आहे.

अशी असेल यंत्रसामग्री (कंसात एकूण संख्या)

कोरोना रुग्णांसाठी : पेडियाट्रिक अँड निओनेटल व्हेंटिलेटर (25), व्हेंटिलेटर ट्युबिंग (100), सक्शन मशिन (1), सिरिंज इन्फ्यूजन पप्म (40), मल्टीपॅरा मॉनिटर विथ एनआयबीपी विथ नेओनेट अँड पेडियाट्रिक प्रोब (30), पल्स ऑक्सिमीटर मॉनिटर विथ निओनेट अँड पेडियाट्रीक प्रोब (50), फिंगर प्लस ऑक्सिमीर्ट (10), ऑक्सिजन फ्लोमीटर्स (5), लॅेरिंगोस्कोप (6), ईसीजी मशिन (1), अम्ब्युबॅग अ‍ॅन्ड फेस मास्क फॉर रेस्युसिटेशन्स (30), रेडियन्ट हिट वॉर्मर (20), डबल सरफेस फोटोथेरपी युनिट (5), स्मार्ट बबल सीपॅप विथ ब्लेन्डर (5), इलेक्ट्रिकल हॉस्पिटल ग्रेड ब—ेस्ट मिल्क पम्प (5), डिफिबि—लेटर (2), 2 डी इको मशिन विथ अल्ट्रासाऊंड विथ पेडियाट्रिक अ‍ॅन्ड निओनेटल प्रोब्स (1) व ग्लयुकोमीटर विथ ग्ल्युकोस्ट्रीप्स (2)

म्युकर मायकोसिस : मायक्रोडिब—ायडर (1 ), मायक्रोडिब—ायडर ब्लेड (1), कोब्लॅटर (1), ईएनटी एन्डोस्कोप कॅमेरा (1), नेझल एन्डोस्कोप (1).

Back to top button