

पुणे ः पुढारी वृत्तसेवा
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तरे द्या आणि कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे आहे. मात्र, 'ईडी'ला सामोेरे जाताना तोंडाला फेस येईल. सोमय्या यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी एक जरी दगड मारला तर महागात पडेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना सोमवारी दिला.
सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात 98 कोटी रुपये ज्या कंपन्यांतून आले, त्या कंपन्या कोठे आहेत आणि कोलकात्याच्या कंपन्यांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक कशी केली, यावर मुश्रीफ यांनी बोलावे. सोमय्या यांनी केलेल्या पहिल्या आरोपावर मुश्रीफ यांनी अजून उत्तर दिलेले नाही.
दुसर्या आरोपांबाबत व मूळ विषयाबद्दल बोलावे. त्यांचे भ—ष्टाचाराचे तिसरे प्रकरण सोमय्या लवकरच बाहेर काढणार आहेत. ते ऐकून मुश्रीफ यांची तब्येत आणि मानसिक संतुलन बिघडू नये, असेही पाटील म्हणाले.
सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास येणार होते, तर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. ही हुकूमशाही आहे. कायद्याची लढाई गुद्द्यांवर आणू नका. महाविकास आघाडीत कोणताही समन्वय नाही. एकमेकांचा हिशेब चुकता करण्याचे काम सुरू आहे. या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय दुसरे काही कोणाला कळत नाही, असा आरोप त्यांनी केला. मुश्रीफ यांना भाजप प्रवेशाची कधीही ऑफर दिली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या दोन नेत्यांची प्रकरणे लवकरच बाहेर काढू
भाजपच्या 'रडार'वर केवळ शिवसेना-राष्ट्रवादी आहे, हा आरोप चुकीचा आहे. आमच्या 'रडार'वर भ—ष्टाचार, अन्याय आणि महिलांवरील अत्याचार आहे. लवकरच आम्ही काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढू, असेही पाटील म्हणाले.
राज्यसभेसाठी उपाध्याय उमेदवार
भाजप राज्यसभेची पोटनिवडणूक लढविणार असून, पक्षातर्फे मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय उमेदवार असतील. दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल व आपण स्वतः त्यावेळी उपस्थित राहणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
फडणवीस 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात
राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रिपद देऊ नका, ते 'मातोश्री'वर कॅमेरे लावतील, असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना त्यावेळी दिला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यावर पत्रकारांनी पाटील यांना पहाटे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली, तेव्हा हाच सल्ला तुम्ही फडणवीस यांना दिला होता का? असा प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. त्यांना सल्ला देण्याची गरज नाही, असे उत्तर दिले.