पुढारी ऑनलाईन डेस्क : पोखराहून नेपाळमधील जोमसोमला जाणारे तारा एअरलाइन्सचे विमान (Tara Plane) आज (दि.२९) सकाळी बेपत्ता झाले होते. हे विमान सापडल्याचे नेपाळी लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे विमान मस्टँगच्या कोवांगमध्ये आढळून आले आहे. मात्र, विमानाच्या स्थितीबाबत नेमकी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही, असे नेपाळी लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे.
लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे (Tara Plane) विमान मानपती हिमाल येथे भूस्खलनामुळे लमचे नदीच्या मुखाशी कोसळले. नेपाळच्या आर्मीचे जवान जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहेत.
मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी सांगितले की, विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले हाेते. धौलागिरी पर्वताच्या दिशेने वळले. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्याचवेळी, जिल्हा पोलीस कार्यालय मुस्तांगचे डीएसपी राम कुमार दाणी यांनी आम्ही विमानाच्या शोध मोहिमेसाठी परिसरात हेलिकॉप्टर तैनात करत आहोत, असे सांगितले होते.
नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणी पोखरेल यांनी सांगितले की, बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मुस्तांग आणि पोखरामध्ये दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टरही शोधासाठी तैनात करण्याची तयारी सुरू आहे.
नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर मुस्तांगला रवाना झाले आहे. हे हेलिकॉप्टर बेपत्ता विमानाचा शोध घेणार आहे.
काठमांडू येथील भारतीय दूतावासाने बेपत्ता विमानाबाबत आपत्कालीन हॉटलाइन क्रमांक +977-9851107021 जारी केला आहे. विमानात ४ भारतीयांसह २२ लोक होते. दूतावासाने ट्विट करून लिहिले की, दूतावास त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे.
दरम्यान, पोखराहून नेपाळमधील जोमसोमला जाणाऱ्या तारा एअरलाइन्सच्या विमान (9 NAET) चा संपर्क तुटला होता. या विमानाने आज सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले. बेपत्ता विमानात ४ भारतीय, तीन जर्मन आणि उर्वरित नेपाळी नागरिक होते. दुहेरी इंजिन असलेल्या विमानात चालक दलासह एकूण २२ प्रवासी होते. दरम्यान, एअरलाइनने सर्व प्रवाशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी चार भारतीयांची नावे आहेत.
हेही वाचलंत का ?