नगर : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम असून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बेलार्ड पिअर येथील कार्यालयात मंगळवारी सात तास कसून चौकशी करण्यात आली. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी संदर्भात साखर कारखान्याला केलेला कर्ज पुरवठा, कारखान्याचा लिलाव आणि खरेदी, विक्रीसंबंधी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे. ईडीच्या या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात पून्हा एकदा खळबळ उडाली आहे.
राज्याचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना 'ईडी'ने दणका दिला आहे. त्यांची नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर मधील 90 एकर जमीन आणि अहमदनगर येथील चार एकर जमीनीचा समावेश आहे. या एकूण मालमत्तेची किंमत 13 कोटी 41 लाख रुपये आहे.
ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस युनिटेक ग्रुप आणि राज्य सहकारी बँकेशी संदर्भात मुंबईसह पूणे, नागपूर आणि अहमदनगरमधील नऊ ठिकाणी छापेमारी केली होती. यात राज्य सहकारी बँकेने कर्जप्रकरणात बुडीत काढलेल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याचा लिलावासंदर्भात कारवाईचा समावेश होता. हा कारखाना बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्सला विकला गेल्याचा आरोप आहे. यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे वडील राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्यासह कार्यालयात शोध मोहीम राबविली होती. त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांना चौकशीला हजर रहाण्यास सांगण्यात आले होते. प्राजक्त तनपुरे हे मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकार्यांकडून त्यांची तब्बल सात तास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी काही कागदपत्रे ईडीला दिल्याची माहिती मिळते. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत.
ईडीला सहकार्य करणार
ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली आहेत. तसेच त्यांनी मागितलेली कागदपत्रेही देण्यात आली आहेत. काही तांत्रिक माहिती संदर्भातील कागदपत्रे सादर करणे बाकी असून ती देखील लवकरच पोच करण्यात येतील. ईडीला पुढेही सहकार्य करण्यात येणार आहे.
– राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे