दुग्धव्यवसायाला आर्थिक स्थैर्य कधी? खासगी संस्थांनी खरेदीदरात घट करण्याचा घाट घातल्याने मोठी अडचण

दुग्धव्यवसायाला आर्थिक स्थैर्य कधी? खासगी संस्थांनी खरेदीदरात घट करण्याचा घाट घातल्याने मोठी अडचण
Published on
Updated on

आबाजी पोखरकर

पिंपरखेड : विविध कारणांनी दुग्धव्यवसायाला उतरती कळा लागली असतानाच खासगी संस्थांनी दूध खरेदीदरात घट करण्याचा घाट घातला आहे. यामुळे शेती व्यवसायाबरोबर भरवशाचा जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय खरेदीदरामुळे बेभरवशाचा ठरत आहे. या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न दूध उत्पादक शेतकर्‍यांना पडला आहे.
सद्य:स्थितीत कडक उन्हाळ्यात चारा, पाणी इत्यादी समस्यांमुळे दूध उत्पादनात घट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत दुग्धव्यवसायात वाढलेली दलाली, खरेदीदरात वारंवार होणारी घट, पशुखाद्याचे वाढलेले भरमसाट दर, यामुळे दुग्धव्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

दुधाला 36 रुपये दर मिळत असल्याने जिवाचे रान करीत शेतकरी रात्रंदिवस राबत असताना ऐन उन्हाळ्यात दूध खरेदीदरात वाढ झाल्यानंतर आता दुधाचे दर 3 रुपयांनी कमी केल्याने आणखी दर कमी करण्याचे षड्यंत्र खासगी दूध संस्थांनी आखल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

बँका, सहकारी संस्था, खासगी संस्थांची कर्जे काढून शेतकर्‍यांनी दुभती जनावरे खरेदी करून दूध व्यवसाय वाढविलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. भुसा, कांडी, पेंड या पशुखाद्यांचे दर वाढले असून, शेतातील उपयुक्त हिरवा चारा, मुरघास विकत घेणे परवडत नाही. चारा, पाणीटंचाई खुराकाचे दर वाढल्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणी आला असतानाच दूध उत्पादनात व दरात झालेली घट, यामुळे बेटभागातील दूध उत्पादक संकटात सापडला आहे.

नेतेमंडळींकडून पद्धतशीरपणे दुर्लक्ष

ग्रामीण भागामध्ये दूधसंकलन व्यवसायांना परवानगी देताना अनेकवेळा शासकीय निकष पायदळी तुडवून खासगी संस्थांना परवानगी दिल्याने सहकारी दूध संघ डबघाईस गेले आणि खासगी दूध संस्थाचालकांचे वर्चस्व वाढत चालले आहे. त्यामुळे यापूर्वी गावातील शेतकरी दूध संघाची संकलन केंद्रे बंद पडल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. खासगी दूधसंकलन, प्रक्रिया उद्योग हे राजकीय नेते यांच्या मालकी, भागीदारीतले असल्याने याकडे मात्र सरकारकडून नेतेमंडळींकडून पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून होत आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना संकटात टाकणारा डाव

शेतकर्‍यांच्या दुधाला कमी दर मिळाल्यास दूध उत्पादन खर्च मिळत नाही. अनेकवेळा अतिरिक्त दुधाच्या नावाखाली दूध खरेदीदरात घट केली जाते. मात्र, त्यामागील कारणांकडे डोळेझाक केली जाते. परिणामी, दूध उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसतो. वाढती भेसळ, दूधसंकलन करणार्‍या संस्थाचालकांवर अंकुश ठेवला तर अतिरिक्त दुधाचे, पावडरचे प्रमाण वाढणार नाही. सध्याच्या कडक उन्हाळ्यात हिरवा चाराटंचाई, पाणीटंचाईची समस्या, दूध उत्पादनखर्चात झालेली मोठी वाढ व उष्णतेचे वाढलेले प्रमाण; त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात सरासरी दूध उत्पादनात दरवर्षीप्रमाणे घट जाणवते. अशा परिस्थितीत दूधदरात घट करण्याचा डाव दूध उत्पादक शेतकर्‍यांना संकटात टाकणारा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news