मुंबई;पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने २ मार्चपूर्वी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत याचिका तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मुंबई भाजप नेत्याकडून दाखल करण्यात आली होती.
ममता यांनी गेल्यावर्षी मुंबई दौरा विविध राजकीय भेटीगाठी केल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. तसेच विविध उद्योगपतींना बंगालमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले होते.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांची तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अजेंडा बाजूला करताना भाजपविरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की, भाजपला २०२४ मध्ये सत्तेतून बाहेर करण्यासाठी मी आज माझ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पक्षाची ताकद मजबूत करण्यास सांगितले आहे. आपण बंगालमधील ३४ वर्षाची सीपीएमची सत्ता घालवू शकतो, तर आपण नक्कीच भाजपला देशातील सत्तेतून हद्दपार करु शकतो. तेच आपले मुख्य शत्रू आहेत. त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. मेघालय आणि चंदीगडमध्ये काँग्रेस भाजप धार्जिणा प्रचार करत असल्याने दु:ख वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आम्हाला वाटते.
हे ही वाचलं का ?