खुशखबर ! एमबीबीएस, बीडीएसच्या जागा वाढल्या

medical college
medical college

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्नता प्रदान केल्यामुळे एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 900 जागा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे बीडीएस अभ्यासक्रमासाठी 100 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत सात एमबीबीएस आणि एक बीडीएस महाविद्यालयाला आवश्यक मान्यता न मिळाल्याने त्यांची नावे वगळण्यात आली होती.

त्यामुळे या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत समावेश झाला नव्हता. मात्र, दुसर्‍या फेरीत एकूण आठ महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने एक हजार जागा वाढल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांची पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये 32 सरकारी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 5 हजार 200, तर खासगी महाविद्यालयांमध्ये 3 हजार 70 जागा आहेत. याबाबतची सविस्तर माहिती सीईटी सेल आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ म्हणाले की, अपुरी शिक्षकसंख्या असल्याने संलग्नतेबद्दल त्रुटी निर्माण झाल्या होत्या. या महाविद्यालयांमार्फत आवश्यक असणार्‍या शिक्षकसंख्येच्या त्रुटी पूर्ततेबद्दल कार्यवाही केली जाईल, अशा स्वरूपाचे हमीपत्र विद्यापीठाकडे सादर केले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे
संबंधित महाविद्यालयांना संलग्नता दिली आहे. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्हणाले की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला याबाबत विद्यापीठातर्फे महाविद्यालय व त्यांच्या प्रवेशक्षमतेबद्दल माहिती देण्यात आली आहे.

समावेश होणारी महाविद्यालये आणि जागा
महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सेवाग्राम (एमबीबीएस – 100)
तेरणा मेडिकल कॉलेज, नवी मुंबई (एमबीबीएस – 150)
एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे (एमबीबीएस – 100)
डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती
(एमबीबीएस – 150)
डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कर्जत (एमबीबीएमस – 100)
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कुडाळ, सिंधुदुर्ग (एमबीबीएस – 150)
वेदांता मेडिकल कॉलेज, पालघर (एमबीबीएस – 150)
तेरणा डेंटल कॉलेज,
नवी मुंबई (बीडीएस -100)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news