दहा लाख रुपयांची लाच स्वीकारणारा अधिष्ठाता अटकेत | पुढारी

दहा लाख रुपयांची लाच स्वीकारणारा अधिष्ठाता अटकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एमबीबीएसच्या प्रवेशासाठी 16 लाखांच्या लाचेची मागणी करून तब्बल 10 लाख रुपयांची लाच स्वीकारणारा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता आशिष श्रीनाथ बनगिनवार (54) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. याबाबत एका 49 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. एसीबीच्या माहितीनुसार, आशिष बनगिनवार हा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता आहे.

तर तक्रारदार यांचा मुलगा 2023 ची नीट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी राज्याच्या पहिल्या कॅप राउंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे तक्रारदार हे बनगिनवार याला प्रवेशाच्या निमित्ताने भेटले. त्याने तक्रारदाराला दरवर्षाची शासनमान्य विहित फी 22 लाख 50 हजार सांगितली. त्याव्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाखांची मागणी केली.

मात्र, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान, बनगिनवार याच्यावर एसीबीने सापळा रचला. त्याला तडजोडीअंती दहा लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याच्या कार्यालयातच एसीबीने बेड्या ठोकल्या. त्याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.

हेही वाचा :

पुणे : टेकडी फोडणार्‍यांवर भरारी पथकाचा ‘वॉच’

विधानसभेच्या सात जागांसाठी 5 सप्टेंबरला पोटनिवडणूक

Back to top button