नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल. त्यात कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावयाचे याविषयी एकवाक्यता ठरवली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या शिंदेगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्योवळी ते बोलत होते. एकलहरे येथील 660 मेगावॉटचा प्रकल्प, शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे तोडले जाणारे वीज कनेक्शन व त्यामुळे उद्ध्वस्त होणारी रब्बीचे पिके यासाठी आपण ऊर्जामंत्र्यांसोबत लकवरक बैठक घेऊन याविषयी लक्ष घालण्याची विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे कर्ज फेडणारे शेतकरी अन् नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देईल, असा शब्द यावेळी तुम्हाला देताे, असे पवार यांनी म्हटले.
आमदार सरोज आहिरे यांनी मागील अनेक वर्षांपासून रखडलेला बालाजी देवस्थानचा प्रश्न, शेतकरी हिताच्या योजना, रस्ते मतदारसंघात राबविल्याचे अजित यांनी कौतुक केले. आमदार सरोज आहिरे यांनी मविघा सरकारच्या काळात अजितदादा यांच्या सहकार्याने आपण साडेचारशे कोटींचे कामे मंजूर करून सुरू केले. यात काही कामे पूर्णही झाल्याचे सांगत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, खासदार हेमंत गोडसे यांचे आभार मानले. शिंदे गावचे माजी सरपंच रतन जाधव यांनी सूत्रसंचालन व मनोगत व्यक्त केले.
सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेले नाहीत, त्यामुळे नेतेमंडळींनी एकमेकाच्या कार्यकाळातील निर्णय रद्द करणे चुकीचे आहे. हा वेगळाच प्रघात घडतोय, याविषयी आम्ही न्यायालयात गेलो असून, लवकरच योग्य निर्णय मिळेल, असे अजित पवार यांनी म्हटले.
शिंदे गावातील पाणीपुरवठा योजनेचे दोनदा पेढे वाटल्याचे प्रसिद्धिमाध्यमात वाचले होते, पण पुढे काय झाले समजले नाही. शिंदे गावातील भगिनींच्या डोक्यावरचे ओझे कमी करण्याठी पाणीपुरवठा योजना आपण राबवत असल्याचे आमदार सरोज आहिरे यांनी यावेळी म्हटले.