Marathi web series : तरुणाईच्या मराठी वेब सीरिजचा डंका!

Marathi web series : तरुणाईच्या मराठी वेब सीरिजचा डंका!

पुणे : मराठी तरुण चित्रपट, नाटक, लघुपटांसह आता मराठी वेब सीरिजच्या निर्मितीकडेही वळले आहेत. तरुणांकडून मराठीतील वेब सीरिज तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मराठी सीरिजमधून वेगवेगळे विषय हाताळले जात असून, या सीरिज आपल्या वेगळ्या धाटणीच्या मांडणीने आणि विषयाने प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. मराठी सीरिजचा सगळीकडे डंका असून, या सीरिजला ओटीटीसह यू-ट्यूब चॅनेलवर चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळेच मराठी तरुण कलाकार आणि दिग्दर्शक सध्या मोठ्या प्रमाणात वेब सीरिजची निर्मिती करीत आहेत.

मराठी वेब सीरिजचे स्वरूप

तरुणांनी तयार केलेल्या सीरिज यू-ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहेत. हिंदीच्या तुलनेत तरुणाई मराठी सीरिजची निर्मिती जास्त प्रमाणात करीत असून, दहा ते पंधरा भागांच्या सीरिजच्या निर्मितीसाठी 10 ते 15 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे. मराठीतील सीरिजची आर्थिक कमाई यू-ट्यूब चॅनेलवर मिळणारे व्ह्यूज प्रायोजकत्व व जाहिरातीतून होत आहे. यू-ट्यूबवर हिंदी-मराठी सीरिजची कमाई त्याला मिळणार्‍या व्ह्यूजवर आधारित आहे. महाराष्ट्रात मराठीतील 70 ते 80 सीरिजची निर्मिती होत आहे.

गावाकडच्या गोष्टींपासून ते प्रेमकथांपर्यंत

मराठी वेब सीरिजच्या जगात वेगळ्या धाटणीचे विषय हाताळले जात असून, खासकरून गावकडच्या कथांवर आधारित सीरिजला पसंती मिळत आहे. गावाकडचे जगणे, प्रेमकथा, रहस्याकथा, सामाजिक, राजकीय, परंपरा-संस्कृतीवर आधारित विषय सीरिजमध्ये पाहायला मिळत आहेत. विषयाला साजेसे लोकेशन, संगीत, कलाकारांचा अभिनय, सीरिजची मांडणीने सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. बदलती जीवनशैली, प्रेमभंग, ताणतणाव, कोरोना काळातील घडामोडी, महिला सुरक्षितता, व्यसनाधीनता अशा विविध विषयांवर सीरिज तयार होत आहेत.

तरुण घेताहेत सीरिजसाठी मेहनत

वेब सीरिजचे जग तरुणाईला खुणावत असून, मराठीतील सीरिज तयार करण्यासाठी संहितेपासून ते शूटिंगपर्यंत सगळ्यात वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकेशन्सवर या सीरिज शूट केल्या जात आहेत आणि दिग्दर्शकापासून ते संगीतकारापर्यंतची संपूर्ण टीम ही तरुणांचीच आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news