कागल; पुढारी वृत्तसेवा : रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में, अशा आक्रमक घोषणा देत सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांनी आज (दि.२६) महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कागल येथे कर्नाटकातून आलेले मराठी भाषिक यांचा जल्लोषी आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. मोठी रॅली काढून आलेल्या मराठी भाषिक बांधवांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांच्या मनामध्ये महाराष्ट्रात राहण्याची भावना प्रकर्षाने जाणवत होती. कर्नाटक शासनाकडून होणारा छळ त्रासदायक ठरत आहे. महाराष्ट्र सरकारने एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून आमच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्यावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने ठराव करावा, कोल्हापूर शहर व जिल्ह्याने आम्हाला कायम सातत्याने मदतीचा हात दिला आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नावर वकिलांची फौज उभी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्रातील जनता आमच्या पाठीशी आहे. मात्र, आमच्या सर्व खासदारांनी एकत्र येऊन गट तट न पाहता आमच्याशी पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यावतीने सीमेवर जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, विजय देवणे, माजी आमदार के. पी. पाटील, नवीद मुश्रीफ, युवराज पाटील यांनी स्वागत केले.
कर्नाटक मधून माजी आमदार मनोहर किणीकर, प्रकाश मरगळे, शुभम शेळके, सचिन सोरटे, विलास कडगलगी, शिवाजी पासेकर, रावसाहेब दळवी, शिवानी पाटील, साधना पाटील, मालोजी अष्टेकर, यशवंत बिरजे यांच्यासह असंख्य मराठी भाषिक महाराष्ट्रात दाखल झाले होते. यावेळी दोन्ही राज्याच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.