पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता "लॉकडाऊन लग्न" या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं आहे. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या –
अमोल कागणे प्रस्तुत "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते. आजवर अमोल कागणे यांच्या हलाल, भोंगा, लेथ जोशी या चित्रपटानी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते.आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल १८हुन अधिक चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत.
कोरोना काळ सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असला, तरी या काळात गंमती-जमतीही अनेक झाल्या होत्या. लग्न म्हटलं, की धमाल असतेच. त्यामुळे "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटातून लग्नाची गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाणार, चित्रपटात कलाकार कोण आहेत, याची आता उत्सुकता आहे