पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठी रंगभूमी ही अधिक प्रगल्भ व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. चिंचवड येथील नाट्यसंमेलनाच्या मुख्य सभामंडपात माध्यमांशी बोलत होते.
डॉ. पटेल म्हणाले की, नाट्य परिषदेच्या शाखा लहान आणि मोठ्या शहरात आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमीचे प्रश्न त्या त्या जागेनुसार बदलतात. त्यानुसार मी आणि नाट्य परिषद ते सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे प्रश्न राजकीय नेत्यांपर्यंत पोहचले जातील. आतापर्यंत नाट्य परिषदेला शासन आवश्यक ती मदत करीत आहे. त्यामुळे सर्व प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. मराठीसह इतर रंगभूमींना सोबत घेऊन काय करता येईल का? हा विचार केला जाईल. त्यातून आशय, दिग्दर्शन, अभियन आणि निर्मिती, यामध्ये आपल्याला नवीन काय करता येईल, यावर प्रामुख्याने भर असणार आहे.
पश्चिम बंगाल, राज्यस्थान, केरळ, कर्नाटक या राज्यातील मराठी प्रेक्षकांना मराठी नाटक पाहता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील. मराठी रंगभूमी प्रगल्भतेसाठी पाश्चात्त्य स्पर्श लागेल, त्यासाठी नाटक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली जाईल. त्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नाट्य आणि रंगकर्मी यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाईल, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
मी ज्या वेळी नाटक करायचे, त्या वेळी रंगभूमी वेगळी होती, आताची वेगळी आहे. डिजिटल युगात नट आणि दिग्दर्शकाला आता स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे.
केवळ नाटक न राहता, तो अनेक माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत पोहचला पाहिजे. नाटकातील अभिनय सिनेमा, मालिका आणि ओटीटी माध्यमांमध्येही उपयोगी पडतो. पुढील वर्षी होणार्या नाट्यसंमेलनांपर्यंत महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींना वेगळे काहीतरी झालेले बघायला मिळेल, असे अश्वासनही डॉ. जब्बार पटेल यांनी दिले.