अर्जुन खोपडे
भोर : भोर तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांना जीव गमवावा लागत आहे. पर्यटनस्थळावर धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात निरा-देवघर धरण, भाटघर धरण, किल्ले रायरेश्वर, रोहिडेश्वर, मोहनगड, कावळा गड, वरंध घाट, नेकलेस पाँईट, राजवाडा, ऐतिहासिक मंदिरे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. सुटीच्या दिवशी येथे अनेक पर्यटक येतात. मात्र प्रशासन धोकादायक ठिकाणी सूचना फलक, योग्य उपाय करत नसल्यामुळे पर्यटकांना धोका पत्कारावा लागतो.
भाटघर, निरा-देवघर धरण काठावर अनेक ठिकाणी अनधिकृत रिसॉर्ट, हॉटेल यांची उभारणी केली आहे. याठिकाणी पर्यटक मुक्काम करून धरणातील पाण्याबरोबर मौज – मजा करून आनंद घेतात. परंतु पाण्याचा अंदाज पर्यटकांना येत नसल्यामुळे जीव गमवण्याचा प्रकार घडत असतात. रिसॉर्ट, हॉटेल मालक पर्यटकांना पूर्व कल्पना देत नसल्यामुळे अनेकांचे जीव जाण्याचे प्रसंग घडत असताना याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुळात धरण काठावर बांधण्यात आलेले रिसॉर्ट, हॉटेल यांची शासनाकडून परवानगी घेतली की नाही, याची पाटबंधारे विभागाने चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तसेच धरणाच्या पाणलोट पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावात पाणलोट क्षेत्रापर्यंत रस्ता असल्यामुळे पर्यटक रस्त्याने वाहनातून धरणाच्या पाण्यापर्यंत जात असतात. मात्र त्यांना पाण्याची खोली दिसत नसल्यामुळे अपघात घडतात. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीने सूचना फलक लावणे गरजेचे आहे. शासनाने पर्यटनस्थळावरील ग्रामपंचायतींची आपत्ती व्यवस्थापनाबाबत पूर्वतयारी करून घ्यावी, तरच भविष्यात असे प्रसंग कमी होतील.
तालुक्यात पावसाच्या दिवसात गड किल्ले, वरंध घाट यांची पाहणी करण्यासाठी असंख्य पर्यटक येत असताता. मात्र गडावर, घाटात संरक्षण रिलींग, कठडे नसल्यामुळे पर्यटकांचा तोल जाऊन ते दरीत कोसळतात. असे अपघात वेळोवेळी घडत असतात. मात्र, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्यासाठी पर्यटन विभाग, बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.
पर्यटनस्थळावर एखादा अनुचित प्रकार घडल्यावर सह्याद्री रेक्सू , भोईराज जल आपत्ती पथकाचे कार्यकर्ते शोध मोहिमेस जात असतात. मात्र, त्यांच्याकडे अपुरी साधनसामग्री असल्यामुळे शोध घेताना अडथळा येतो. त्यांच्यासाठी शासनाने दोर, वॉकीटॉकी, सर्च लाईट, रोप, फाँडिंग रोप, साहित्य, लाईफ जॅकेट यांची उपलब्धता करून द्यावी. यासह 40 ते 45 किलोमीटरपर्यंत घडलेल्या घटनेपर्यंत पोचवण्यासाठी शासनाने वाहतूक खर्च उपलब्ध करून द्यावा.
सचिन देशमुख आणि उमाकांत गुजर,
सह्याद्री रेक्सू टीम आणि भोईराज जल आपत्ती पथक.
हेही वाचा