काका-पुतण्यातील बेबनाव अखेर उघड | पुढारी

काका-पुतण्यातील बेबनाव अखेर उघड

मुंबई, सुरेश पवार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संघटनेत महत्त्वाचे फेरबदल केले. भाकरी फिरवीत असताना, शरद पवार यांनी आपल्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती करताना आपला राजकीय वारसदार म्हणून खा. सुळे यांच्याच पारड्यात आपले वजन टाकले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गेल्या काही वर्षांपासून अंतर वाढत चालले होते. आता मात्र काका-पुतण्यातील हा बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

पहाटेपूर्वीच्या शपथविधी प्रकरणात अजित पवार यांनी वेगळा रस्ता पकडण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, शरद पवारांनी मुत्सद्दीपणाने त्यांची कोंडी केली. पक्ष आणि कुटुंब यांचा प्रमुख मीच आहे, असे स्पष्ट करीत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यामागे जाणार्‍यांना योग्य तो संदेश दिला. अजित पवार यांना एकाकी पाडले. त्यांना घरवापसीशिवाय पर्यायच राहिला नाही.

अलीकडेही अजित पवार काही काळ अचानक गायब झाले होते. पण त्यांचे जे काही मनसुबे होते ते काही ते वास्तवात उतरवू शकले नाहीत. यापूर्वीही पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद देताना विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी दिली होती आणि अजित पवारांना डावलले होते. सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्याबरोबर पक्षाच्या इतर मंत्र्यांनीही राजीनामे दिले. पण शरद पवारांनी अजित पवार यांचा एकट्याचा राजीनामा मंजूर केला. त्यांचा हा संदेश उघडच होता.

मावळसारख्या तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असलेल्या लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला, तेव्हाच काका-पुतण्यातील दुरावा उघड झाला होता.

गेल्या महिन्यातच शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली, तेव्हाच त्यांनी आजच्या निर्णयाची तयारी केली असणार, असे म्हणता येईल. त्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी ‘दादा, दादा’ असा आवाज दिला, तेव्हा त्यांना सुप्रिया सुळे यांनी फटकारले होते.

आजच्या नवी दिल्लीच्या बैठकीत काय होणार, याची बहुधा अजित पवारांना कल्पना असावी. बैठक संपताच ते तातडीने बाहेर पडले. बैठकीतही ते विमनस्कपणे बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पवार यांची भीती

* अजित पवार हे आक्रमक आहेत. आर्थिकसह अनेक बाबींनी समर्थ आहेत. त्यामुळे पक्षात त्यांना महत्त्वाचे पद दिल्यास कालांतराने साराच पक्ष ताब्यात घेतील, अशी साधार भीती शरद पवार यांना वाटली असेल; तर ती अस्थानी मानता येणार नाही. शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रासह आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील साम्राज्यही मोठे आहे. अजित पवारांनी पक्ष कब्जात घेतला तर ते या साम्राज्यातही चंचुप्रवेश करतील, अशीही भीती त्यांना भेडसावत असली, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.

सुप्रिया सुळे यांच्याकडे सर्व सूत्रे

* आता शरद पवार यांनी आपले सहकारी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले आहे. सुप्रिया सुळे यांनाही तेच पद दिले आहे. पण तसे पद देताना त्यांनी सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे सर्वाधिकार दिले आहेत. महाराष्ट्र राज्याबाहेर राष्ट्रवादी काँगे्रसचे अस्तित्व अगदी नगण्य आहे. स्वाभाविकच पक्षाची सारी आणि खरी सूत्रे सुप्रिया यांच्याच हाती आली आहेत. या नव्या परिस्थितीत अजित पवार काय करणार, जुळवून घेणार की वेगळे काही करणार, हा आता कळीचा मुद्दा ठरणार आहे.

अजित पवार नाराज नाहीत : जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रवादी हाच आपला एकमेव राजकीय शत्रू वाटत असल्यामुळे त्यांनी बाळगलेले लोक राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका करण्यासाठी सोडले आहेत. परंतु आता अशा लोकांची टीका सहन करणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

येथील राष्ट्रवादी भवनात शनिवारी आयोजित केलेल्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व नेस्तनाबूत कसे करायचे हा प्रयत्न काही वर्षे सुरू आहे. गेल्या चार-आठ दिवसांत सत्ताधार्‍यांनी बाळगलेल्या लोकांनी टीका करताना खालची पातळी गाठली आहे. आपल्या पक्षाचे नेतृत्व हे देशातील सर्वात प्रगल्भ, अनुभवी आणि भारताला योग्य दिशा देणारे नेतृत्व आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेतील टीका सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यावर टीका केल्याशिवाय सत्तेत बसणार्‍यांचा एकही दिवस जात नाही. आज महाराष्ट्रात जातीयवादी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याठिकाणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठरावीक पक्ष करत आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गेल्या एक-दोन महिन्यांत निरनिराळ्या भागात, शहरात जे वातावरण निर्माण करण्यात आले, याचा अर्थ एकच आहे की, यांना आता निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचे पाप काही लोक करत आहेत. पण सत्तेत बसलेले लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांना आळा घालण्याचे सामर्थ्य सत्ताधार्‍यांमध्ये नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Back to top button