पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur Violence : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी (दि. 22) पुन्हा हिंसाचार उसळला. यानंतर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना येथे परत बोलावण्यात आले आहे. राजधानीच्या न्यू चेकॉन भागात स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जाळपोळीच्या घटना घडल्या. तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ 144 कलम लागू करत संचारबंदीची घोषणा केली. दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. त्यानंतर आदिवासींनी बिगर आदिवासी मीतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ 3 मे रोजी एकता मोर्चा काढला. यानंतर राज्यात एका आठवड्यापेक्षा जास्त काळ हिंसक संघर्ष झाला, ज्यामध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हिंसक चकमकींनंतर हजारो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. अखेर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.
मणिपूरमध्ये सोमवारी (दि.२२) दुपारी पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली. इंफाळमधील न्यू लॅम्बुलेन भागात अज्ञात व्यक्तींनी चार घरांना आग लावली. परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी आसाम रायफल्सचे जवान, मणिपूर पोलिस दाखल झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व इंफाळमधील न्यू चेकोन परिसरात आज काही दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले, त्यानंतर अज्ञातांकडून येथील चार घरांना आग लावण्यात आली. या हिंसाचार प्रकरणात मणिपूरमधील माजी आमदार आणि त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. परंतु या कारवाईला अद्याप कोणीही दुजोरा दिला नसल्याचे वृत्त 'एएनआय' ने दिले आहे.