कागल ; बा. ल. वंदूरकर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांच्यात झालेल्या घमासान लढाईनंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार की पुन्हा मनोमीलन होणार याची उत्सुकता लागलेली आहे. (mandlik vs mushrif)
टोकाच्या आरोप-प्रत्यारोपानंतर भविष्यातील निवडणुकांमध्ये कसे पडसाद उमटणार याबाबत आतापासूनच तर्कवितर्क लढविले जात आहेत. कागल तालुक्यातून मंत्री हसन मुश्रीफ, खा. मंडलिक आणि भैया माने हे तिघेही बँकेत पुन्हा निवडून आले आहेत. तर दोन्ही विजयी महिला उमेदवार या कागल तालुक्यातील माहेरवाशिणी आहेत.
बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या आघाडीचे नेतृत्व बँकेचे विद्यमान अध्यक्ष मुश्रीफ यांनी केले तर विरोधी आघाडीचे नेतृत्व खा. संजय मंडलिक यांनी केले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
या निवडणुकीमध्ये मंत्री मुश्रीफ यांची तालुका सेवा संस्था गटातून बिनविरोध निवड झाली तर प्रक्रिया गटातून खा. मंडलिक विजयी झाले. त्यांना त्यांच्या गटाच्या निश्चित असलेल्या मतापेक्षा तालुक्यातून जादा मते मिळाली तर भैया माने यांनाही 611 मते मिळाली.
महिला गटातून कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील माहेरवाशिनी असलेल्या श्रृतिका शाहू काटकर या विजयी झाल्या आहेत तर माजी खासदार निवेदिताताई माने याही विजयी झाल्या आहेत. त्या तालुक्यातील यमगे येथील माहेरवाशिनी आहेत.
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप करण्यात आले होते. अंबानी – अदानीची उपमा देण्यात आली. निवडणूक लादल्याचा आरोप करण्यात आला. सत्तारूढ आघाडीला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा देखील पाठिंबा होता, मात्र प्रचारादरम्यान ते कुठल्याही व्यासपीठावर दिसले नाहीत.
शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे मात्र सत्तारूढ आघाडीच्या प्रचारासाठी सक्रीय झाले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगे ते तीन गट तालुक्यामध्ये एकत्र काम करीत आहेत.
पंचायत समितीच्या सत्तेची विभागणी देखील तिन्ही गटात झालेली होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निकालानंतर आघाडी पुन्हा एकत्र येणार काय याबाबतची चर्चा सुरू आहे. बँकेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी संजय मंडलिक कोणती भूमिका घेणार? याकडेही तालुकावासियांचे लागले आहे.