‘मुंबई इंडियन्‍स’च्‍या कर्णधारपदावरुन रोहित शर्माला का हटवले? प्रशिक्षक जयवर्धनेंनी दिले उत्तर…

राेहित शर्मा.(संग्रहित छायाचित्र)
राेहित शर्मा.(संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्‍स संघाने कर्णधारपदावरुन रोहित शर्माची ( Rohit Sharma) उचलबांगडी केली. रोहितच्‍या जागी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची कर्णधारपदी निवड करण्‍यात आली आहे. या निर्णयानंतर चाहत्‍यांनी सोशल मीडियावर संतप्‍त प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे. आता यावर मुंबई इंडियन्‍स संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी आपले मत व्‍यक्‍त केले आहे. यावेळी मुंबई इंडियन्‍समध्‍ये आता रोहितची भूमिका कोणती असेल यावरही भाष्‍य केले आहे. (Mumbai Indians IPL 2024)

Mumbai Indians IPL 2024 : हा एक कठीण आणि भावनिक निर्णय होता…

JIO सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत महेला जयवर्धने यांनी सांगितले की, फ्रँचायझीच्या भवितव्यासाठी या निर्णयाची आवश्‍यकता होती. हा एक कठीण निर्णय होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर तो भावनिक होता. या निर्णयावर चाहत्यांनी (प्रतिक्रिया देणे) योग्य आहे. मला वाटते की प्रत्येकजण भावनिक आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे; पण एक फ्रेंचायझी म्हणून तुम्हाला निर्णय घ्‍यावे लागतात. नेतृत्वात बदल होऊनही रोहित शर्मा संघात महत्त्वाची भूमिका बजावत राहील, असेही जयवर्धने यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai Indians IPL 2024 : रोहित संघात असणे आमच्‍यासाठी खूप महत्त्‍वपूर्ण

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी रोहित शर्मा संघात, मैदानावर आणि मैदानाबाहेर असणे आमच्यासाठी खूप महत्त्‍वाचे आहे. तो एक गुणवान क्रिकेटपटू आहे. मला खात्री आहे की तो आम्‍हाला मार्गदर्शन करेल, असा विश्‍वासही जयवर्धने यांनी व्‍यक्‍त केला.

हा निर्णय केव्‍हा तरी घ्‍यावा लागणारच होता

हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय हा विचारपूर्वकच घेण्‍यात आला. हा निर्णय खूप लवकर घेण्‍यात आला, असे काहींना वाटेल; परंतु हा निर्णय आम्हाला कधीतरी घ्यावा लागणार होता, असेही जयवर्धने यांनी स्पष्ट केले. हार्दिक पंड्या बर्‍याच काळापासून मुंबई इंडियन्‍स संघाबरोबर जोडलेला आहे. त्यामुळे यात काही नवीन नाही. त्‍याची अष्टपैलू कामगिरी संघासाठी खूपच महत्त्‍वपूर्ण ठरते. गुजरात संघाचे नेतृत्व करण्याचा त्याचा अनुभव खूप महत्त्‍वपूर्ण आहे.

सचिन तेंडुलकर यानेही दुसर्‍या कोणाला तरी नेतृत्‍व दिले

सचिन तेंडुलकर हाही युवा खेळाडूंसोबत आयपीएल खेळला. त्याने दुसर्‍या कोणाला तरी नेतृत्व दिलेच होते. मुंबई इंडियन्स योग्य दिशेने जात असल्याची खात्री केली. आताही तसेच काहीसे आहे. आमच्‍यात यावर चर्चा झाली आहे, असेही जयवर्धने यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news