महाराष्ट्र शाहीर : ‘बहरला हा मधुमास…’ गाणे रिलीज

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दर बारा कोसावर मराठी भाषा बदलते तर तिचे वेगवेगळे रंग त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या, बोलीच्या खुणा मिरवत असतात. काही वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे ती कणखर, खट्याळ होऊन हसवते तर काही ठिकाणी खोचकही होतेच. भाषेचा तसाच एक परस्परविरोधी पोत आगळ्या ढंगात अनुभावायला मिळणार आहे तो 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटामध्ये. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने!

'जय जय महाराष्ट्र माझा…' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला 'महाराष्ट्र शाहीर' २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेकविध वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट प्रकाशनाआधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले 'बहरला हा मधुमास…' हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे.

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर झालेले हे गीत म्हणजे १९४२ सालच्या रंगात रंगलेले आणि २०२३ सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे.

गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आणि अजय गोगावले व श्रेया घोषाल यांनी गायले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. 'महाराष्ट्र शाहीर'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे!

"हे एक प्रेमगीत असून शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या प्रेमाची कथा त्यातून अलगद उलगडत जाते. शाहीर म्हणजे माझे आजोबा हा अस्सल सातारी रांगडा गडी तर माझी आजी ही शहरी पार्श्वभूमी असलेली एक सुविध्य तरुणी. कलेच्या एका धाग्याने दोघेही एकत्र आलेले आणि जणू एकमेकांसाठीच जन्मलेले. 'बहरला हा मधुमास…'मधून त्यांच्या प्रेमकथेचा जणू एक आगळा आविष्कारच समोर येतो. गीतकार आणि संगीतकारांनी या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे," असे उद्गार चित्रपटाचा दिग्दर्शक केदार शिंदे याने काढले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news