पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटातील राष्ट्रवादीचे आमदार सलग दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील वायबी चव्हाण केंद्रात पोहोचले, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra Politics News )
शरद पवार भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, माझ्यासह अजित पवार, सुनील तटकरे यांनी वाय. बी . चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहावा, अशी विनंती केली आहे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी शरद पवार यांची रविवारी ( दि. १७ ) भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मंत्री धनंजय मुंडे, आदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भूजबळ यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे ही भेट घेतली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यामुळे शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची वेळ न घेता आज (दि.१६) वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्य़ांनी भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी (Ajit Pawar Meet Sharad Pawar) बोलताना दिली होती.
आम्ही सर्वांनी शरद पवारांना विनंती केली की, राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा. सर्वांची इच्छा आहे की, राष्ट्रवादी एकसंध राहावी, मजबुतीने पुढे काम करावे, यापुढे तुम्ही मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. परंतु, पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले हाेते.
अजित पवार गटातील मंत्र्यांनी झालेल्या घटनेबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. याच्यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक सुरू होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचा फोन आला, शरद पवार यांनी तातडीने बोलावले असं त्यांनी सागितलं. सत्ताधारी पक्षासोबत जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी झालेल्या घटनेबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. सगळ्यांना एकत्रीत करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. ही अनपेक्षित घटना आहे, यावर भाष्य करणे योग्य नाही. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करू, असे पाटील यांनी म्हटलं हाेतं.
हेही वाचा